दापोलीतील नवभारत छात्रालयात स्मृती मेळाव्यासह पुरस्कार वितरण समारंभाचे २२ रोजी आयोजन
विविध मान्यवर राहणार उपस्थित
संगमेश्वर : नवभारत छात्रालय दापोली येथे २२ जानेवारी २०२३ रोजी पूज्य सामंत गुरुजी, पूज्य शिंदे गुरुजी स्मृति मेळावा आणि सेवाव्रती पांडुरंग शिंदे गुरुजी स्मृति पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी ‘ वर्तमान शिक्षण व्यवस्था आणि भविष्य ‘ या विषयावर व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी उपस्थित रहावे , असे आवाहन कुणबी सेवा संघ दापोलीच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे अध्यक्ष म्हणून तर , डॉ . महेंद्र कदम प्राचार्य विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभुर्णी ता . माढा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत . सदर कार्यक्रम रविवार २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता नवभारत छात्रालय , पूज्य सामंत गुरुजी सदन, शिवाजीनगर दापोली येथे संपन्न होणार आहे. नवभारत छात्रालयाचे संस्थापक पूज्य सामंत गुरुजी यांच्या ५७ व्या आणि त्यांचे शिष्य , कन्या छात्रालयाचे संस्थापक आणि छात्रालयाच्या आर्थिक स्वावलंबनाचे शिल्पकार सेवाव्रती पूज्य पांडुरंग शिंदे गुरुजी यांच्या १६ व्या स्मृति दिनानिमित्त उत्कृष्ट काम करणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक शिक्षक , प्रगतीशील शेतकरी , विस्तार कार्यकर्ता , समाजसेवक , कृषी उद्योजक यांना शाल श्रीफळ , स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
या सर्व कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कुणबी सेवा संघ , दापोलीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे , उपाध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत , सरचिटणीस हरिश्चंद्र कोकमकर यांनी केले आहे.