खेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात सहा जनावरे जखमी ; रेडकाची शिकार

खेड : खेड तालुक्यातील ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून 19 नोव्हेंबर रोजी अलसुरे-शिरीषकरवाडी येथे शेतकरी नीलेश प्रकाश शिरीषकर यांच्या गुरांच्या गोठ्या घुसून बिबट्याने एक रेडकू मारून शिकार केली. याच ठिकाणी असलेल्या पाच अन्य रेडकूंच्या तसेच एका गाईच्या अंगावरही बिबट्याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमा केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिजघर गावात हा बिबट्या सातत्याने दिसत असून त्याचा वावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत स्पष्टपणे कैद झाला आहे. काही दिवसांपूर्वीच या बिबट्याने एका वासरावर हल्ला केला होता. विशेष म्हणजे बिबट्याचा वावर ज्या भागात सुरू आहे, त्या परिसरात कातकरी समाजाची वस्ती असल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत दाटून आली आहे. दोन दिवसांपूर्वीही पुन्हा बिबट्या त्या परिसरात आल्याचे दिसून आल्याने भीतीचे सावट अधिक गडद झाले आहे.





