जुन्या काळातील ठेकेदार महादेव यशवंतराव यांचे निधन
देवरूख (सुरेश सप्रे ) : देवरूख शहरातील मधली आळी येथील जुन्या काळातील शासकिय ठेकेदार महादेव राजाराम यशवंतराव यांचे वृद्धापकाळाने वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले.
स्वातंत्र्यानंतरच्या काळातील व महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषदेच्या निर्मितीनंतर सार्वजनिक बांधकाम व जिल्हा परिषद बांधकाम या विभागात ठेकेदार म्हणून त्यांनी अनेक दर्जेदार कामे करत आपल्या वेगळा ठसा उमटविला. तालुक्यातील विकासात अनेक कामांत त्यांचे मोठे योगदान आहे. तालुक्यात पहिला क्रशर त्यांनी सुरू केला. ठेकेदार म्हणून काम करताना त्यांनी त्या काळात अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला. तसेच मातृमंदिरच्या देवरूख शिक्षक प्रसारक मंडळाच्या उभारणीत त्यांनी मोठे योगदान दिले होते. ते त्या संस्थांचे आजीवन सदस्य होते.
त्यांनी वयाचे शतक पार केलेल्याने त्यांचा शताब्दी सोहळा गतवर्षी साजरा करण्यात आला होता. गेले पाच- सहा वर्षे ते पायाच्या दुखण्याने बेजार झाले होते. तरी त्यांची स्मरणशक्ती चांगली होती.
दि. २२ रोजी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्याचे पश्चात दोन मुलगे व दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. भाजपाचे युवा नेते सुधीर यशवंतराव यांचे ते वडील तर जिल्हा प्राथमिक पतपेढीच्या जिल्हा संचालक सौ. स्नेहल जाधव- यशवंतराव यांचे सासरे होत. त्याच्यावर वाडेश्वर स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले.