पैसा फंडने आपल्याला स्वप्न दाखवत जिद्द आणि इर्शा दिली : रवींद्र माने
पैसाफंड स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम
संगमेश्वर : व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात आपण शिक्षण घेतले. या विद्यालयात शिकताना आपल्याला पैसा फंडने स्वप्न तर दाखवलीच जोडीला जिद्द आणि इर्शा देखील दिली. यासर्वाच्या जोडीला आवश्यक असणारे जीवाभावाचे मित्र येथे लाभल्यामुळे आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने राज्यमंत्री पदापर्यंत पोहोचलो असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी पैसा फंड संगमेश्वर येथे बोलताना केले.
पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन रवींद्र माने यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि सरस्वतीच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात रवींद्र माने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, नावडी सरपंच प्रज्ञा कोळवणकर , माजी विद्यार्थी अभय पाध्ये, विकास शेट्ये, विश्वास कोळवणकर मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदि मान्यवर उपस्थित होते .
यावेळी पुढे बोलताना रवींद्र माने म्हणाले की , आपण सामान्य कुटुंबातून पुढे आलो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आपल्याला मंत्रीपद मिळाले . रत्नागिरी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा आणि संगमेश्वर तालुक्याचा शिवसेनेच्या माध्यमातून अपेक्षित विकास करता आला याचा आपल्याला आनंद आहे. व्यापारी पैसा फंड संस्था आणि पैसा फंड इंग्लिश स्कूल शतक महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. आपल्यासह आजवरचे माजी विद्यार्थी संस्थेसह शाळेच्या प्रगतीसाठी आपले बहुमोल योगदान देतील, अशी ग्वाही माने यांनी यावेळी दिली.
उपस्थित सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचा मनसोक्त आस्वाद घेतला आणि बक्षिसांच्या रुपाने कलागुण सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतूक केले . विविध गुणदर्शन कार्यक्रमात असणारी विविधता पाहून पालकवर्गाने देखील समाधान व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चिता कोकाटे यांनी केले . ध्वनी आणि प्रकाशयोजना फकीर पावस्कर यांनी केली . कार्यक्रमासाठी परिसरातील गावचे सरपंच , उपसरपंच , पोलीस पाटील , प्रतिष्ठित ग्रामस्थ , माजी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.