संगमेश्वर येथील प्रतिष्ठित व्यापारी सुधाकर नारकर यांचे निधन

संगमेश्वर दि. ८ : संगमेश्वर बाजारपेठेतील प्रतिष्ठित व्यापारी आणि व्यापारी पैसा फंड संस्थेचे माजी अध्यक्ष सुधाकर जगन्नाथ नारकर ( वय ८३ ) यांचे पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संगमेश्वर व्यापारी संघटना, व्यापारी पैसा फंड संस्था आणि पैसा फंड इंग्लिश स्कूलतर्फे त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सुधाकर जगन्नाथ नारकर यांनी संगमेश्वर येथे जगन्नाथ ट्रेडिंग कंपनी या फर्मद्वारे अनेक वर्षे यशस्वीपणे व्यापार केला. सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी प्रथम व्यापारी पैसा फंड संस्थेत संचालक म्हणून आणि तदनंतर काही काळ अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. गेली काही वर्षे त्यांची प्रकृती बरी नव्हती. पुणे येथे वास्तव्याला असतानाच अल्पशा आजाराने त्यांचे देहावसान झाले. त्यांच्या पश्चात मोठे कुटुंब आणि परिवार आहे.