कुणबी सेवा संघ, अश्विनी ऍग्रो फार्मतर्फे मोफत फळझाडे वाटप

संगमेश्वर दि. २९ : स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असणारी कुणबी सेवा संघ दापोली ही सामाजिक संस्था समाजातील रंजल्या गांजल्या लोकांच्या उद्धारासाठी आर्थिक आणि शैक्षणिक कार्य करत आहे. दोन वर्षांपूर्वी या संस्थेचा अमृत महोत्सव साजरा केला गेला. आज या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले असून संस्थेने जनमानसात आदराचे स्थान निर्माण केले आहे.ही संस्था अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवत आहे. या उपक्रमांपैकी नवभारत छात्रालय परिवार हा या संस्थेचा महत्त्वाचा उपक्रम आहे .या उपक्रमांतर्गत संस्था शेतकऱ्यांना शेतीविषयक आवश्यक तंत्रज्ञान वापरा विषयी मार्गदर्शन, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके इत्यादी उपक्रम राबवीत असते. शेतकऱ्यांनी भाजीपाला, फळझाडे इत्यादी लागवडीसाठी प्रोत्साहित व्हावे म्हणून दर्जेदार भाजीपाला बियाणे आणि फळझाडे यांचे मोफत वाटप केले जाते.
काळी मिरीची ४ हजार रोपे, ८हजार कोकम रोपे, आणि २ हजार चिकू कलमे, यांचे वाटप करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. काळी मिरी रोपे आणि चिकू कलमे ही संस्थेचे विद्यमान अध्यक्ष प्रभाकर शिंदे सर आपल्या स्वतःच्या अश्विनी ऍग्रो फार्म या रोपवाटिकेतून उपलब्ध करून देणार आहेत. आणि संस्थेमार्फत कोकम रोपे वाटप करण्यात येणार आहेत. या कामात संस्थेला अनेक समाजसेवी संस्था/ हितचिंतक आणि तिच्या माजी विद्यार्थ्यांचे बहुमोल सहकार्य मिळते.
चिपळूण तालुक्यातील खांदाटपाली आणि२६ जुलै२०२४ रोजी खेड तालुक्यातील घाणेकु़ंट येथे मोफत फळझाडे वाटपाचा कार्यक्रम घेतला गेला. दोन्ही गावातील १०० शेतकऱ्यांना संस्थेमार्फत प्रत्येकी चार कोकम कलमे मे. अश्विनी ऍग्रो फार्म यांच्यामार्फत दोन काळीमिरी आणि एक चिकू कलम यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला संस्थेचे सभासद प्रभाकर तेरेकर यांनी संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती विस्तृतपणे सादर केली. संस्थेचे नाव कुणबी सेवा संघ असे असले तरी संस्था स्थापनेपासून जात धर्म पंथ असा भेदभाव न करता सर्वच धर्मातील लोकांसाठी काम करत आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
संस्थेचे नामवंत माजी विद्यार्थी आणि विद्यमान कृषी विकास अधिकारी ,पंचायत समिती खेड दिनेश राणे यांनी वाटप करण्यात येणाऱ्या रोपांची लागवड, संगोपन आणि उत्पादन अर्थशास्त्र या विषयी माहिती विस्तृतपणे सांगितली. ज्याप्रमाणे आमच्या आई-वडिलांनी आम्हाला संस्थेच्या ताब्यात दिल्यानंतर संस्थेने आमचे संगोपन केले व आदर्श नागरिक बनविले त्याप्रमाणे संस्थेने दिलेली ही झाडे संस्थेची बालके आहेत,असे समजून त्यांचे संगोपन करावे आणि एका रोपाचे हजारो रोपे करून आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन शेतकऱ्यांना केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री. हरिश्चंद्र कोकमकर, खजिनदार प्रदीप इप्ते, सदस्य प्रभाकर तेरेकर आणि दिनेश राणे उपस्थित होते. खांदाटपाली येथे झालेल्या कार्यक्रमास गावचे माजी सरपंच आणि समाजसेवक अजय महाडीक यांनी संस्था करत असलेल्या कामाचे कौतुक करून या संस्थे मार्फत मिळत असलेल्या सुविधांचा माझ्या गावातील आणि जवळच्या परिसरातील शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न नक्कीच करू असे आश्वासन दिले.
घाणेकुंट येथे झालेल्या कार्यक्रमात एक आदर्श सरपंच म्हणून ओळख असणारे संतोष ठसाळे यांनी या संस्थेमार्फत मोफत भाजीपाला बियाणे वाटप कार्यक्रमाचा चांगलाच फायदा झाल्याचे सांगितले.या संस्थेचे कार्य पाहण्यासाठी फळझाडे आणण्याच्या निमित्ताने मी संस्थेमध्ये गेलो होतो. संस्था करत असलेल्या कार्याने आम्ही प्रभावित झालो असे त्यांनी सांगितले. दोन्ही कार्यक्रम सुयोग्यरीत्या पार पाडण्यासाठी माणदेशी फाउंडेशन शाखा चिपळूणच्या प्रतिनिधी श्रीमती श्रद्धा रेडीज आणि त्यांचे सहकारी यांचे बहुमोल सहकार्य मिळाले.कार्यक्रमाचे सुयोग्य सूत्रसंचलन ग्रामसेविका श्रीमती स्वप्नाली चांदे यांनी केले.