उदय सामंत रत्नागिरीचे पालकमंत्री ; नितेश राणे सिंधुदुर्ग तर अदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री

रत्नागिरी : अपेक्षेप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर सिंधुदुर्गच्या पालकमंत्री पदी नव्यानेच मंत्री झालेले नितेश राणे तर रायगडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी अदिती तटकरे यांच्याकडे देण्यात आली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर कोणत्या जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा कोणाकडे जाते याकडे लक्ष वेधून राहिले होते. त्यातच प्रजासत्ताक दिनी जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी होणाऱ्या ध्वजारोहणाचा मान कोणाला मिळतो याकडे लक्ष वेधून राहिले होते. अखेर या संदर्भातील प्रतीक्षा शनिवारी संपली आहे. यानुसार रत्नागिरीच्या पालकमंत्रीपदी उदय सामंत यांची तिसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रथमच मंत्री बनलेल्या नितेश राणे यांच्याकडे सिंधुदुर्गची तर रायगडची पालकमंत्री पदाची जबाबदारी अदिती तटकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.