एप्रिलपासूनच्या पाण्याच्या नियोजनाची तयारी आतापासूनच करा : पालकमंत्री उदय सामंत
![](https://ratnagirilive.in/wp-content/uploads/2023/11/IMG-20231129-WA0015-780x470.jpg)
रत्नागिरी : स्थानिक लोकप्रतिनिधींची वेळ घेऊन पाणी टंचाईचे आराखडे तयार करावेत. 15 जानेवारीपर्यंत त्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी मिळेल हे पहावे. 1 एप्रिल पासूनच्या पाण्याच्या नियोजनाची तयारी आतापासून करावी, अशी सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रत्नागिरी जिल्हा पाणी टंचाई आढावा बैठक घेतली. बैठकीला जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी सह प्रांताधिकारी, तहसीलदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली. यामध्ये जिल्ह्यात झालेला पाऊस, धरणांमधील पाणीसाठा, मागील वर्षाची टँकर परिस्थिती याबाबतचा समावेश होता.
पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले, पाणी टंचाईबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना कल्पना द्या. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी त्यांची वेळ घेऊन आराखडे तयार करावेत. त्याला 15 जानेवारीपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळेल, असे पहावे. जलजीवन मिशनमध्ये 100 टक्के काम झाले पाहिजे. त्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 15 दिवसांनी आढावा घ्यावा, असेही ते म्हणाले.
यावेळी जात पडताळणी संदर्भातही त्यांनी आढावा बैठक घेऊन प्रलंबित असणारी कामे मार्गी लावण्याची सूचना केल्या.