कर्मचाऱ्यांनी काम करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा : लेखाधिकारी प्र. श. बिरादार
कोषागार दिन कार्यक्रम उत्साहात साजरा
रत्नागिरी : कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी आनंदाने पार पाडल्यास एखादे क्लिष्ट कामही सोपे होवून जाते, असे प्र. श. बिरादार लेखाधिकारी लेखापरीक्षण पथक (शिक्षण) रत्नागिरी यांनी सांगितले.
कोषागार दिनाचे औचित्य साधून जिल्हा कोषागार कार्यालय येथे आयोजित ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी मा.श. वाघमारे, सहायक संचालक स्थानिक लेखा निधी संदिप पाटील, कोषागार कार्यालयाचे अपर कोषागार अधिकारी रविंद्र मोरे, अनिकेत गावडे, श्रीमती एम.एम.जगदाळे, सहायक नियोजन अधिकारी श्री. वंझारी, लेखाधिकारी उमेश मगदूम आदी उपस्थित होते.
मानसिक ताण हे अनेक शारिरीक आजारांना निमंत्रण देत असते. अनेक वेळा शुल्लक गोष्टींचा ताण घेणे अतिमहत्वाकांक्षा, इतरांबरोबर स्वत:ची तुलना करणे यामुळे अनेक शारिरीक समस्यांना सुरुवात होते. हा ताण कमी करण्यासाठी माणसांनी स्वत:ची भूमिका योग्य पध्दतीने व आनंदाने पार पाडावी. स्वत:साठी वेळ देणे, चांगले छंद जोपासणे, रागावर नियंत्रण ठेवणे, आत्मपरीक्षण करणे इत्यादी माध्यमातून तणाव कमी होण्यास मदत होते असे यावेळी श्री. बिरादार यांनी सांगितले.
जिल्हा कोषागार अधिकारी श्री. वाघमारे यांनी कार्यालयीन कामकाजात सांघिक कार्य महत्वाचे असते. कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे आनंदाने काम केल्यास कार्यालयीन कामकाजात अडथळे निर्माण होत नाहीत असे सांगून सर्वांना कोषागार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी लेखा व कोषागारे विभागाच्या विभाग व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये जिल्हा कोषागार कार्यालय रत्नागिरीच्या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सुवर्णपदक- (थाळीफेक)-प्रविण बोरकर, कनिष्ठ लेखापाल, (२०० मी. धावणे व लांबउडी)-संगिता कवाळे, कनिष्ठ लेखापाल. रौप्यपदक-(गोळाफेक)- गोपाळ पोफळनारे, कनिष्ठ लेखापरीक्षक स्थानिक निधी लेखा, (बुद्धीबळ)-विठ्ठल मालंडकर, सहायक लेखाधिकारी, (कॅरम महिला) मयुरी चव्हाण, उपलेखापाल, (कॅरम दुहेरी)- शशिकांत केतकर, लेखालिपिक, जयेश कुलकर्णी लेखालिपिक. (टेबल टेनिस दुहेरी)-गणेश देशमुख सहायक लेखाधिकारी, साईसंकेत बामणे कनिष्ठ लेखा परीक्षक स्थानिक निधी लेखा. कास्यपदक- (100 मी. धावणे)- संगिता कवाळे कनिष्ठ लेखापाल. (लांबउडी)-भरत आरेकर लेखालिपिक. सांस्कृतिक द्वितीय क्रमांक- (गायन)- प्रविण कांबळे, कनिष्ठ लेखापाल. सामुहिक क्रिडास्पर्धा- संचलन द्वितीय क्रमांक, हॉलीबॉल द्वितीय क्रमांक. 100X4 रिले महिला तृतीय क्रमांक. अमरावती येथील राज्यस्तरीय स्पर्धा संगिता कवाळे कनिष्ठ लेखापाल, २०० मी. धावणे उपविजेता पदक आदींचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहायक लेखाधिकारी विठ्ठल मालंडकर यांनी केले. कार्यक्रमाला कोषागार कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.