कुवारबाव – पाटबंधारे ऑफिस ‘फ्लाय ओव्हर’चा प्रश्न मार्गी लागणार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी – उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यात कोल्हापूर येथे चर्चा
कोल्हापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी तसेच राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यात कोल्हापूरमध्ये झालेल्या भेटीदरम्यान रत्नागिरी -कोल्हापूर महामार्गावरील कुवारबाव येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून आरसीसी उड्डाणपूल उभारण्याच्या कामाला गती मिळाली आहे.
मिऱ्या (रत्नागिरी ) ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या जवळच असलेल्या कुवारबाव येथे मागील अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीच्या समस्या उद्भवू लागली आहे. सकाळी तसेच सायंकाळी गर्दीच्या वेळीकुवारबाव येथे रस्ता पार करणे देखील पादचाऱ्यांना अवघड होऊन जाते. यावर कायमचा उपाय म्हणून काही वर्षांपूर्वीच कुवारबाव ते पाटबंधारे ऑफिस दरम्यान उड्डाणपूल उभारण्याचा प्रस्ताव पुढे आला. मध्यंतरी हा प्रस्ताव रखडला होता.
दरम्यान, शुक्रवारी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कोल्हापूरमध्ये भेट घेऊन त्यांच्याशी कोकणातील विविध विकास कामांचा संदर्भात चर्चा केली.
कोकणाच्या विकासासाठी आणि जयगड बंदरास जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड रस्त्याचे चौपदरीकरण करण्यास आज ना. गडकरी यांनी मंजुरी दिली. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व संबंधित उपस्थित होते. याचवेळी कुवारबाव पाटबंधारे ऑफिस दरम्यान प्रस्तावित असलेल्या आरसीसी उड्डाणपुलाच्या कामाला गती मिळाली आहे.