कोकणसाठी रो-रो बोट सेवा नियमित सुरू राहणार : ना. नितेश राणे

- भाजपची गावागावात ताकद; कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी पुरेसा निधी मिळालाच पाहिजे – ना. नितेश राणे
चिपळूणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मांडली भूमिका
चिपळूण : भाजपची गावागावात ताकद आहे, त्यामुळे सक्रिय कार्यकर्त्यांना पक्ष वाढत असताना बळ दिले पाहिजे, यासाठी पुरेसा निधी उपलब्ध झाला पाहिजे, भाजपची ताकद दाखवली पाहिजे, स्वबळावर निवडणुका झाल्या पाहिजेत अशी इथल्या कार्यकर्त्यांची भावना आहे असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना. नितेश राणे यांनी चिपळूण येथील पत्रकार परिषदेत केले.
गुरुवारी चिपळूण येथे आलेल्या ना. राणे यांनी वशिष्टी डेअरी प्रकल्पाला भेट दिली, त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष वाढवत असताना गावातील ग्रामस्थ भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे विकासात्मक कामांची निवेदने देत आहेत. मात्र, जिल्हा नियोजन मधून तितकासा निधी मिळत नसल्याचे सांगतानाच पालकमंत्री ना. उदय सामंत, आ. किरण सामंत, आ. शेखर निकम यांना प्रत्येकी २० कोटी तर भाजपाचे खासदार नारायण राणे यांना केवळ ५ कोटींचा निधी विकासात्मक कामांसाठी मिळत आहे, हे थांबणार कधी असा सवाल ना. राणे यांनी यावेळी उपस्थित केला.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. स्वबळावर लढलो तरच आपली ताकद दिसून येईल, असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. तेव्हा आपण कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवू, असे ना. नितेश राणे यांनी यावेळी स्पष्ट केले.
रो- रो बोट सेवा केवळ गणेशोत्सवासाठी नाही तर नियमित सुरू राहील, अशी ना. राणे यांनी ग्वाही दिली. गणेशोत्सव काळात दोन मोदी एक्सप्रेस सुरू करण्यात येणार आहे. ही एक्सप्रेस रत्नागिरीत देखील थांबणार आहे. तरी गणेश भक्तांनी बुकिंगसाठी भाजपच्या जिल्हाध्यक्ष व मंडळ अध्यक्षांकडे दिनांक १७ व १८ ऑगस्ट रोजी संपर्क साधावा, असे आवाहन केले. तसेच देवगड येथील रखडलेले मत्स्य महाविद्यालय सुरू होण्यासाठी मंगळवारी मुंबईत बैठक होणार असल्याची माहिती ना. राणे यांनी यावेळी दिली. मुंबई- गोवा महामार्गाच्या कामावर आमचे बारीक लक्ष आहे. पुढच्या वर्षी हा मार्ग पूर्ण होईल, असा विश्वास पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, उद्योजक प्रशांत यादव, भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, वाशिष्ठी डेअरीच्या मुख्य प्रवर्तक सौ. स्वप्ना यादव, भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ. चित्रा चव्हाण, माजी नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ना. राणे म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीत त्यांचे खासदार जेव्हा निवडून आले तेव्हा आलबेल होते. मात्र, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते ओरड करीत आहेत. मनाप्रमाणे झाले नाही की लोकशाही धोक्यात, असे बोलणे म्हणजे उद्धव ठाकरेंचे हे बोलणे शेंबड्या पोराप्रमाणे आहे. मुंबईचा महापौर भगवाधारी महापौर महायुतीचा बसणार असा विश्वास व्यक्त करतानाच भास्कर जाधव यांची जी सध्या भूमिका सुरू आहे ती त्यांच्या पक्षाची भूमिका आहे का? ते उद्धव ठाकरे यांनी एकदा जाहीर करावं, असे आव्हानच ना. नितेश राणे यांनी यावेळी दिले.
यावेळी भाजपा चिपळूण शहर मंडल अध्यक्ष शशिकांत मोदी, गुहागर माजी तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, खेड दक्षिण मंडळ अध्यक्ष विनोद चाळके, गुहागर मंडळ अध्यक्ष अभय भाटकर, खेड उत्तर मंडळ अध्यक्ष ऋषिकेश मोरे, चिपळूण ग्रामीण पश्चिम मंडल अध्यक्ष उदय घाग, दापोली ग्रामीण मंडळ अध्यक्ष सचिन होडबे, दापोली शहर अध्यक्ष सौ. जया साळवी, मंडणगड अध्यक्ष प्रवीण कदम, सौ. स्मिता जावकर, चिपळूण माजी तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, माजी नगरसेवक आशिष खातू, श्रीराम शिंदे, संदीप भिसे, शुभम पिसे आदी उपस्थित होते