कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी तीन तासांचा ‘मेगा ब्लॉक’

जनशताब्दी, नेत्रावतीसह तीन गाड्या रखडणार !
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूण ते संगमेश्वर दरम्यान रेल्वेकडून देखभाल दुरुस्तीसाठी गुरुवार दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या तीन एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
मागील काही दिवसांपासून कोकण रेल्वे मार्गावर देखभाल दुरुस्तीसाठी मेगा ब्लॉक घेऊन रेल्वेची अत्यावश्यक कामे पूर्ण केली जात आहेत. कोकण रेल्वे कडून नव्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवार दि. ७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी साडेसात ते साडेदहा या वेळेत मेगा ब्लॉक चे नियोजन करण्यात आले आहे.
या गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम
१) कोकण रेल्वे मार्गावरील या मेगाब्लॉकमुळे नागपूर ते मडगाव दरम्यान धावणारी (01139) विशेष गाडी जिचा प्रवास सहा सप्टेंबर रोजी सुरू होतो ती गाडी कोलाड ते चिपळूण दरम्यान सुमारे शंभर मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.
२) मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव जंक्शन दरम्यान धावणारी सात सप्टेंबर रोजी ची जनशताब्दी एक्सप्रेस (12051) कोलाड ते चिपळूण दरम्यान चाळीस मिनिटे थांबवून ठेवली जाणार आहे.
३) याचबरोबर तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी नेत्रावती एक्सप्रेस (16346) जिचा प्रवास सहा सप्टेंबर रोजी सुरू होतो ती रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान 40 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.