खेड-पनवेल मार्गावर उद्या दुपारी पूर्णपणे अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन धावणार!
- गणेशोत्सवानंतर चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी व्यवस्था
खेड : गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाच्या सोयीसाठी त्या दि. 24 सप्टेंबर रोजी खेड ते पनवेल अशी आठ डब्यांची पूर्णपणे अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन धावणार आहे. यामुळे खेडपासून पुढे पनवेल पर्यंतच्या प्रवासासाठी चाकरमान्यांना यावर्षी प्रथमच हक्काची गाडी मिळाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी ज्यादा गाड्यांच्या शेकडो फेऱ्या सध्या सुरू आहेत. गोवा तसेच सावंतवाडीकडून येणाऱ्या गाड्या खालून येतानाच भरून येत असल्यामुळे खेडपासूनच्या पुढील प्रवाशांना गर्दीच्या वेळी गाडीत चढणे देखील मुश्किल होते. यावेळी गैरसोय टाळण्यासाठी खेड ते पनवेल (07102) ही मेमू स्पेशल ट्रेन रविवार दिनांक 24 रोजी खेड स्थानकावरून दुपारी ३ वाजून १५ मिनिटांनी सुटेल आणि पनवेलला ती त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजून 45 मिनिटांनी पोहोचेल.
खेड पनवेल मेमू स्पेशलचे थांबे
कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव, माणगाव, इंदापूर, कोलाड तसेच रोहा.
खास खेड येथून पहिल्यांदाच मेमू स्पेशल
कोकण रेल्वे मार्गावरील खेड ते पनवेल अशी धावणारी ही पहिलीच मेमू स्पेशल गाडी आहे. गणेशोत्सवानंतर परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने यावेळी मेमू स्पेशल गाडीचे रविवारी नियोजन केले आहे. खेड सह दापोली मंडणगड तसेच रायगड जिल्ह्यातील कोकणवासी यांना या गाडीचा लाभ होणार आहे.