गावावरून मुंबईला परत येताना रेल्वेचे कन्फर्म आरक्षण मिळण्यासाठी अशी वापरा युक्ती!

- रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव आणि रोहा तालुक्यातील प्रवाशांसाठी उपयुक्त
मुंबई : गावावरून मुंबईला येताना सर्वांनीच वेटिंग लिस्टचा सामना केला असेल. बऱ्याचदा मांडवी, कोकणकन्या एक्सप्रेस सारख्या गाड्यांचे तिकीट वेटिंग लिस्टच असते. त्याचे कारण कोकण रेल्वेने रत्नागिरीच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे दिलेला असमान कोटा आहे. रत्नागिरीच्या दक्षिणेकडे साधारण ८५% व उत्तरेकडे केवळ १५% ते २०% कोटा दिलेला आहे. त्यामुळे रत्नागिरी व उत्तरेकडील स्थानकांना लगेच वेटिंग लिस्ट लागते या उलट काही वेळेला रत्नागिरीच्या दक्षिणेकडील स्थानकांपासून तिकिटे उपलब्ध असतात.
गावावरून मुंबईकडे येताना आपल्या स्थानकावरून वेटिंग लिस्ट दिसल्यास १०१०४ मांडवी एक्सप्रेसला आडवली व २०११२ कोंकणकन्या एक्स्प्रेसला विलवडेपासून, १११०० मडगाव लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसला कणकवलीपासून (म्हणजेच रत्नागिरीच्या आधीच्या थांब्यापासून) तिकीट उपलब्ध आहे का ते पहावे. असल्यास तेथून आरक्षण करुन ‘बोर्डिंग पॉइंट’ आपण जिथून प्रवास करणार (रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वर, खेड, माणगाव किंवा रोहा) असाल ते करून घ्यावे. बोर्डिंग पॉइंट बदल आरक्षण करतानाच किंवा गाडी सुरुवातीच्या स्थानकावरून सुटण्याच्या २४ तास आधीपर्यंत करू शकतो. *ते करणे आवश्यक आहे.
इतर गाड्यांमध्ये पुढीलप्रमाणे पर्याय तपासावेत : १२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस, २२११६ करमळी लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस आणि २२२३० मडगाव मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला कणकवली तर २२१२० मडगाव मुंबई तेजस एक्स्प्रेसला कुडाळ.
महत्वाचे
जागांचे हे असमान वितरण केवळ मुंबईकडे येताना गोव्यातून सुटणाऱ्या गाड्यांसाठीच असून दक्षिणेकडून येणाऱ्या व मुंबईतून मडगावकडे जाणाऱ्या (तेजस एक्सप्रेस वगळता) गाड्यांमध्ये सर्व स्थानकांना समान कोटा आहे याची नोंद घ्यावी.