दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी आज मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना देणार अंतिम इशारा!

- शिवसेनेचे माजी खा. विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पुन्हा एकदा महाप्रबंधकांना भेटणार
रत्नागिरी : तब्बल दोन दशके रत्नागिरी ते दादर मार्गावर धावणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला कोरोनाच्या नावाखाली मुंबईबाहेर काढून त्या जागी उत्तर प्रदेशसाठी दोन गाड्या चालवल्या जात आहेत. दादर ते रत्नागिरी मार्गावरील ही पॅसेंजर पूर्वीप्रमाणेच सोडली जावी यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत हे मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची आज सायंकाळी ४:३० वाजता पुन्हा एकदा भेट घेऊन मध्य रेल्वेला अंतिम इशारा देणार आहेत.
पूर्वी रत्नागिरी ते दादर मार्गावर चालणारी सर्वसामान्यांची पॅसेंजर गाडी दादर या मुंबईतील मध्यवर्ती जंक्शनवरून सुटणाऱ्या गाडीला मुंबईतून बाहेर काढून ती दिव्यावरूनच परत पाठवली जात आहे. ही गाडी पुन्हा आधीप्रमाणेच दादरवरून रत्नागिरीसाठी सोडली जावी तसेच दादर येथून सावंतवाडीसाठी पॅसेंजर यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत हे काही दिवसांपूर्वीच मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना भेटले होते. त्यांनी रेल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह प्रवासी संघटनांच्या शिष्टमंडळासोबत मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांना रत्नागिरी दादर पूर्वीप्रमाणेच दादर येथून सोडण्याची मागणी केली होती. त्यांनी त्या संदर्भातील निवेदन देखील महाप्रबंधकांना दिले होते.
मात्र, या संदर्भात मध्य रेल्वे कडून कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने आज दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी शिवसेनेचे शिष्टमंडळ रेल कामगार सेनेच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांची पुन्हा एकदा भेट घेऊन त्यांना अंतिम इशारा देणार आहेत. सर्वसामान्य प्रवाशांसाठी शिवसेनेसह इतर राजकीय पक्ष, प्रवासी संघटनांनी हा मुद्दा उचलून धरल्याने दादर रत्नागिरी पॅसेंजर बाबतचा लढा आता निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे.