किशोर नवाथ्ये यांचे निधन

रत्नागिरी : येथील नवाथ्ये मंगल कार्यालयाचे संचालक किशोर यशवंत नवाथ्ये (वय ६१) यांचे आज पहाटे खासगी रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
जावडे (ता. लांजा) हे मूळ गाव असलेले किशोर नवाथ्ये रत्नागिरीत येऊन खाद्यपदार्थांची निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय छोट्या जागेत छोट्या प्रमाणावर करू लागले. आई आणि जनता सहकारी बँकेत नोकरीला असलेले बंधू तसेच कुटुंबीय यांच्या मदतीने त्यांनी हा व्यवसाय वाढविला. अल्पावधीत त्यांनी त्या व्यवसायात नाव कमावले. कालांतराने त्यांनी रत्नागिरीच्या मिरजोळे एमआयडीसी भागात आपला व्यवसाय हलविला. तेथे २५ वर्षांपूर्वी त्यांनी छोटे मंगल कार्यालय सुरू केले. छोट्या-मोठ्या सभा, मुंजी, लग्न समारंभ, कौटुंबिक आणि धार्मिक मेळावे यासाठी हे मंगल कार्यालय त्यांनी उपलब्ध करून दिले. अल्पोपाहार, भोजनाची उत्कृष्ट व्यवस्था केली. कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण मंडळ या नव्याने स्थापन झालेल्या संस्थेला त्यांनी स्थापनेपासूनच भरीव सहकार्य केले. संस्थेच्या सर्वच कार्यक्रमांना त्यांनी कार्यालय उपलब्ध करून दिले. जावडे या आपल्या मूळ गावातील मंदिर, उत्सव तसेच रत्नागिरी, लांजा तालुक्यातील विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये ते सक्रिय सहभागी होत असत.
मृदू स्वभाव, वक्तशीरपणा, आदबशीरपणा आणि रुचकर खाद्यपदार्थ अशा अनेक कारणांमुळे नवाथ्ये आपल्या व्यवसायात लोकप्रिय झाले. समाजाच्या वेगवेगळ्या थरातील असंख्य माणसे त्यांनी जोडली होती. गेली काही वर्षे भाट्ये येथील सर्वंकष विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची अल्पोपहार आणि भोजनाची व्यवस्था ते सांभाळत होते.
काल रात्री त्यांना त्रास जाणवू लागल्याने रत्नागिरीच्या खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांचे आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दुपारी त्यांच्या निवासस्थानाहून निघालेल्या अंत्ययात्रेत शेकडो लोक सहभागी झाले होते. रत्नागिरीच्या चर्मालय स्मशानभूमीत कै. नवाथ्ये यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा बंधू-भगिनी आणि त्यांचा परिवार असे मोठे कुटुंब आहे.