मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस गणेशोत्सवात धावणार १६ डब्यांची!

- गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना मोठा दिलासा
रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी कोकणला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. सध्या ८ डब्यांची धावणारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव ही वंदे भारत एक्सप्रेस (22229/22230) आता दुप्पट क्षमतेने, म्हणजेच १६ डब्यांची चालवली जाणार आहे. कोकण विकास समितीने केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, याबाबत आता केवळ रेल्वेच्या अधिकृत घोषणेची प्रवाशांना उत्सुकता आहे.
कोकण विकास समितीच्या पाठपुराव्याला यश
मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यापासूनच या गाडीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही गाडी नेहमीच पूर्ण क्षमतेने धावत असल्याने, कोकण विकास समितीने वेळोवेळी ही गाडी १६ किंवा २० डब्यांची चालवावी, अशी मागणी केली होती. मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या लेखी पाठपुराव्यानंतर अखेर या मागणीला यश मिळाले आहे.
गणेशोत्सवासाठी विशेष सेवा
मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, २५ ते ३० ऑगस्ट २०२५ या कालावधीत ही गाडी ८ ऐवजी १६ डब्यांसह धावणार आहे. यामुळे मुंबई-गोवा प्रवासासाठी वंदे भारत एक्सप्रेसमध्ये अधिक जागा उपलब्ध होणार असून, गणेशोत्सवातील वाढती गर्दी कमी करण्यास मदत होईल. या सहा दिवसांत, वंदे भारत एक्सप्रेसच्या डाऊनच्या तीन आणि अपच्या तीन अशा एकूण सहा फेऱ्या या १६ डब्यांच्या रेकने होणार आहेत.
हा पर्यायही रेल्वेसमोर राहणार खुला
रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, गणेशोत्सवातील गर्दी पाहता 16 डब्यांच्या रेकसह तीन दिवस तर ८ डब्यांचा रेक वापरून तीन दिवस (अतिरिक्त फेऱ्या ) असे सहा दिवस वंदे भारत एक्सप्रेस चालवणे रेल्वेला शक्य आहे.
दरम्यान, गणेशोत्सव आठ ऐवजी 16 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय कोकणातील प्रवाशांची मागणी आणि गर्दी लक्षात घेता गणेशोत्सवात महत्त्वाचा ठरला आहे. यामुळे, आता अनेक प्रवाशांना वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट बुकिंग करणे सोपे होणार आहे. आठ ऐवजी 16 डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस धावणार असल्याने वंदे भारत एक्सप्रेसची वेटिंग वर तिकीट असलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.