मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान-रत्नागिरी जिल्ह्याची ताकद : पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : स्व. शामराव पेजे सांस्कृतिक भवन, रत्नागिरी येथे रविवारी मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान कार्यशाळा उद्घाटन सोहळ्याला जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती दर्शवली. आजच्या विशेष कार्यक्रमात स्वच्छता, शिक्षण, ग्रामसभा आणि ग्रामविकास यावर पालकमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण संवाद साधला.स्वर्गीय आर.आर. पाटील यांनी सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाची आठवण करून देत, ग्रामपंचायत ही लोकशाहीची खरी शाळा आहे आणि गावाचा सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री असतो हे ना. सामंत यांनी अधोरेखित केले.
ग्रामसभा यशस्वी होण्यासाठी फक्त सरपंच किंवा ग्रामसेवक नाही तर सर्व ग्रामस्थ, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन काम करणं आवश्यक आहे.जिल्हा परिषदेचे अधिकारी, शिक्षण व पाणीपुरवठा विभाग यांनी जबाबदारीने योगदान दिल्यास, रत्नागिरी जिल्हा स्वच्छतेत आणि विकासात महाराष्ट्रात नंबर १ ठरू शकतो असे वक्तव्य या कार्यक्रमानिमित्त त्यांनी केले.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, गावोगाव स्वच्छता प्रकल्प आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठीच्या योजना या अभियानातून अधिक गतीने राबवल्या जातील.रत्नागिरी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. त्यांच्या संस्कृतीचा वारसा जपत, आपण सर्वांनी मिळून या जिल्ह्याला स्वच्छ, समृद्ध आणि आदर्श जिल्हा बनवूया असं सांगितले.
जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षितजी यादव, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांसह जिल्हा परिषदेचे अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक व बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते