रत्नागिरीतील परिपूर्ण शिवसृष्टी, त्रिमितीय मल्टीमीडिया शोच्या लोकार्पणासह सोमवारी स्किल सेंटरचे भूमिपूजन

- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार लोकार्पण
- उद्योग मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती
रत्नागिरी : राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या पाठपुराव्याने साकारत असलेल्या रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटरसह रत्नागिरीतील परिपूर्ण शिवसृष्टी तसेच शोचे लोकार्पण दि. 17 मार्च रोजी करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार आहेत.
शहरानजीकच्या चंपक मैदानात रतन टाटा स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दिनांक 17 मार्चला सायंकाळी ४:०० वाजता करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला अभियांत्रिकीचे शिक्षण घेणारे जवळपास तीन हजार विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. अभियांत्रिकी शिक्षण पश्चात कोणत्या प्रकारचे कौशल्य प्राप्त करावयाचे याचे सादरीकरण यावेळी दिले जाणार आहे.
या कार्यक्रमासह भगवती किल्ल्यावर याआधी शिवसृष्टी टप्पा क्रमांक एक खुला करण्यात आला आहे. मागील वर्षी नवरात्रोत्सवा दरम्यान पहिल्या टप्प्यातील शिवसृष्टी खुली करण्यात आली आहे. आता दिनांक 17 मार्च रोजी परिपूर्ण शिवसृष्टीचे टप्पा क्रमांक दोन अंतर्गत लोकार्पण करण्यात येणार आहे. भगवती किल्ल्यावर याच ठिकाणी शिवसेनेच्या वतीने 17 मार्चला सायंकाळी तिथीनुसार शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या तिसऱ्या कार्यक्रमात शहरातील थिबा पॅलेस येथे सुरू करण्यात येणाऱ्या थ्रीडी मल्टीमीडिया शो चे लोकार्पण देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केले जाणार आहे. हा कार्यक्रम 17 मार्च रोजी संध्याकाळी ८:०० वाजता होईल.





