महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

रत्नागिरीत पटवर्धन वाडीमधील विहिरीत पडलेल्या पाड्याला जीवदान

  • किसान मोर्चाचे शहर अध्यक्ष प्रसाद बाष्टे आणि सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेचे श्राजेश आयरे यांचा पुढाकार

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील पटवर्धन वाडीतील बाष्टे कंपाऊंडमधील विहिरीत पाडा पडला असल्याचे भाजपा किसान मोर्चाचे प्रसाद बाष्टे यांच्या रविवारी सकाळी निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश पोतकर यांच्याशी संपर्क साधून ही बाब सांगितली. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. ज्ञानेश पोतकर यांनी ही बाब तात्काळ प्राणीमित्र श्री.रोहन वारेकर यांच्या कानावर घालून, तत्काळ सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेच्या श्री.राजेश आयरे यांनाही संपर्क केला. तसेच पत्रकार श्री.योगेश हळदवणेकर यांच्यामार्फत रत्नागिरी नगरपालिकेतील अधिकारी इंद्रजीत चाळके यांना तत्काळ संपर्क करून त्यांच्यामार्फत रत्नागिरी नगरपालिकेची अग्निशामक यंत्रणेला पाचारण करण्यात आले.

घटनास्थळी किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पोतकर तसेच गोशाळेचे राजेश आयरे दाखल झाले. स्वतः किसान मोर्चाचे शहराध्यक्ष श्री.प्रसाद बाष्टे जातीनिशी हजर होतेच पण त्यांनी विशेष जबाबदारी स्विकारताना यंत्रणेला मदत करण्यात मोठी जबाबदारी घेतली होती. त्यांच्यासोबत राजेश आयरे यांनी जेसीबीची व्यवस्था केली. याठिकाणी श्री.दिलीप बाष्टे, श्रीम.पद्मा पटवर्धन, श्री.शंकर कारवे हे मदतीला होते. यावेळी रत्नागिरी नगरपालिकेची अग्निशामक दल तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अग्निशामक दल सुद्धा दाखल झाले.

ही विहीर खोल असून दहा फुटांवर पाणी आणि त्याखाली साधारणपणे पन्नास फुट खोल असल्याने हे कार्य खूपच जोखमीचे होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी सेफ्टी बेल्ट विहिरीत टाकून लॉक करण्याचा खुपदा प्रयत्न केला पण तो अयशस्वी होत होता. त्यानंतर जेसीबी चालक संजू राठोड यांच्या जेसीबीच्या मदतीने श्री.स्वप्निल पारकर आणि श्री.उसेब डांगीकर हे विहिरीत उतरले त्यांनी पाड्याच्या भोवती सेफ्टी बेल्ट अग्निशामक दलाच्या जवानांच्या मदतीने व्यवस्थित बांधला. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर पाड्याच्या भोवती सेफ्टी बेल्ट बांधुन जेसीबीच्या आणि अग्निशामक दलाच्या मदतीने सुखरूप काढण्यात आले. रात्रीपासून विहिरीत पोहून पाडा खूपच दमला होता. त्याला त्यांनंतर पद्मा पटवर्धन यांच्या भारत एजन्सीच्या टेम्पोने सोमेश्वर शांतीपीठ गोशाळेत श्री. राजेश आयरे यांच्या मार्फत नेण्यात आले.

यावेळी रत्नागिरी अग्निशामक दलात श्री. नरेश मोहिते, श्री. रमेश नार्वेकर, श्री. श्रीकृष्ण ढेपसे तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशामक दलामध्ये श्री. आनंद राऊत, श्री. दिलिप दळवी, श्री. राजु मुळे, श्री. राकेश बाबर, श्री.प्रमोद राठोड यांनी उत्तम कर्तव्य बजावले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे शहरात कोणताही आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास रत्नागिरी नगरपालिकेच्या अग्निशामक दालामध्ये केवळ एकच कायमस्वरूपी नियुक्ती असून बाकी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर बोलावले जातात. रत्नागिरी नगरपालिकेच्या अग्निशामक दालामध्ये रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरातील समक्ष व सशक्त स्थानिक युवा वर्गाला नियुक्ती दिल्यास मोठा फायदा त्यांना होईलच पण शहरातील ही यंत्रणा अधिक सक्षम होईल. याबाबत भाजपा किसान मोर्चाचे शहराध्यक्ष श्री. प्रसाद बाष्टे सदर बाब जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष यांच्यासह भाजपाचे नेते मा.श्री. रविंद्र चव्हाण, मंत्री मा. श्री. उदय सामंत व आमदार मा. श्री. किरण सामंत यांच्या निदर्शनास आणून त्यांना भेटणार आहेत.

या मोहिमेत सर्वानी सहकार्य केले खास करुन राजेश आयरे, ज्ञानेश पोतकर, रोहन वारेकर, योगेश हळदवणेकर, अभिजीत चाळके, पद्मा पटवर्धन यासह दोन्ही अग्निशामक यंत्रणा आणि विहिरीत उरलेल्या दोन्ही युवकांसह, जेसीबी चालक संजू राठोड तसेच नगरपालिका प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल किसान मोर्चा शहराध्यक्ष प्रसाद बाष्टे यांचे आभार मानले आहेत.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button