रत्नागिरी जिल्ह्यात २१ मार्चपर्यंत क्षयरोग तपासणी मोहीम
रत्नागिरी : क्षयरोग रुग्ण शोध व तपासणी मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
रत्नागिरी दि. 11(जिमाका) : राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत रत्नागिरी जिल्हयातील अतिजोखमीच्या भागात प्रत्यक्ष गृहभेटी देऊन संशयित क्षयरुग्णांची तपासणी करुन निदान झालेल्या क्षयरुग्णांना प्रत्यक्ष उपचाराखाली आणण्यासाठी दि.८ मार्च २०२३ ते २१ मार्च २०२३ या कालावधीत प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम (Active Case Finding) राबविण्यात येत आहे.
ही मोहीम जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार, जिल्हा शल्य चिकित्सक रत्नागिरी डॉ.श्रीम.एस.के. फुले, व जिल्हा आरोग्य अधिकारी रत्नागिरी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जात आहे.
दोन आठवडयापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, दोन आठवडयापेक्षा जास्त मुदतीचा ताप, वजनात लक्षणीय घट, तसेच थुंकीवाटे रक्त पडत असल्यास, मागील एक महिन्यापासून छातीत दुखणे, अशी लक्षणे दिसत असलेल्या किंवा यापूर्वी क्षयरोगाचे उपचार घेतलेले असल्यास अशा व्यक्तीनी गृहभेटीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करुन आपली तपासणी करुन घ्यावी व निदान झालेल्या क्षयरुग्णांना शासकीय आरोग्य संस्थेत मोफत औषधोपचार केले जाणार आहे.
तरी घरी येणा-या आरोग्य कर्मचा-यास व स्वयंसेवकांना आपली उचित माहिती देवून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हा क्षयरोग अधिकारी रत्नागिरी डॉ. महेंद्र गावडे यांनी केले आहे.