लांजा-दाभोळे मार्गावरून चिरे वाहतूक करणाऱ्या गाड्यांना बंदी घालवी
- युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष बाबा धावणे यांची तहसीलदारांकडे मागणी
लांजा : लांजा नायब तहसीलदार यांची बुधवारी भेट घेऊन युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष बाबा धावणे यांनी निवेदन देवून लांजा दाभोळे मार्गे होणारी चिरे वाहतूक बंद करण्याची मागणी केली.
या संदर्भातील निवेदनात असे म्हटले आहे की, लांजा तालुक्यातून पावसाळा सुरू असतानाही मोठ्या प्रमाणात चिरे वाहतूक सुरू आहे. आपण कोकणातील पावसाचा विचार करता अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत. तसेच चिरे वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. तसेच लांजा दाभोळे रस्त्याचा विचार करता येवढी अवजड वाहतूक या रस्त्यावरून करू शकत नाही. तसेच सर्व चिरे उत्खनन सापुचेतळे येथून होत आहे. तरी सर्व वाहने देवधे फाटा येथून लांजाकडे न येता पाली मार्गे वाहतूक करण्यास कोणतीही हरकत नाही.
तरी आपण चिरेखाण मालक व चिरे वाहनधारकांना सूचना करून गुरूवारी म्हणजे ४/०७/२०२४ या मध्यरात्री पासून लांजा दाभोळे मार्गे वाहतूक बंद करण्यात यावी. नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शुक्रवारी सकाळी पासून वाहतूक बंद करणार आहोत. त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले तर याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल अशा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया फ्रंटचे जिल्हाध्यक्ष दाजी गडहिरे, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लांजा नगरसेवक राजेश हळदणकर, नगरसेविका पुर्वा मुळे, पप्पू मुळे उपस्थित होते