वेरळ येथील जि. प. शाळेत परसबाग निर्मितीचा उपक्रम
लांजा : शासनाच्या मार्गदर्शनानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमधील परसबाग निर्मितीचा उपक्रम जि.प. मराठी शाळा वेरळ येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
शाळेच्या या अत्यंत नावीन्यपूर्ण व ज्ञानवर्धक प्रात्यक्षिक उपक्रमात सहभागी होताना विद्यार्थ्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. सृजनशीलतेचा आनंददायी अनुभव विद्यार्थी प्रत्यक्ष घेत होते. सदर उपक्रमासाठी शाळेतील इ.१ ली ते ७ वीच्या विद्यार्थी, शिक्षक व पालक आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी जोरदार तयारी केली होती. या परसबागेतून विद्यार्थ्यांना निसर्गाचा प्रत्यक्ष सहवास लाभणार असून, शेतीची माहिती आणि आवड निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच यामधून तयार होणाऱ्या पालेभाज्या विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारात वापरावयाच्या असल्याने विद्यार्थ्यांना अत्यंत सकस व पौष्टिक, चवीष्ट आहार मिळणार आहे.
शाळेमध्ये परस बाग निर्मिती करताना आधुनिक शेती व यांत्रिक शेती, बैलांचे जोत व ट्रॅक्टर च्या सहाय्याने नांगरणी करून मशागत करून अळी तयार करून पालेभाजी, पडवळ, काकडी, टोमॅटो, मिरची,वांयगे, घेवडा, दोडका, कारली, झेंडूची झाडे बियाणे लावण्यात व पेरण्यात आली. याशिवाय भाताची रोपे लावणी कशी करावी याचेही प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
शिक्षणा सोबत मुलांना शेतीची आवड व शेतीविषयक माहिती मिळावी ह्या साठी हा आज उपक्रम शाळे मध्ये राबविण्यात आला. या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी विनोद सावंग , केंद्र प्रमुख कांबळे,यांचे मार्गदर्शन लाभले तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र साळवी, मुख्याध्यापक संदीप कदम, उपाध्यक्ष श्रावणी जाधव, जयवंत साळवी,मनोहर डाकवे, यशवंत गावडे, काशिनाथ जाधव भागवत, गावडे, सौ. कांबळे या सर्वांनी सहभाग घेतला.
कोकणातील पारंपारिक शेती भात लागवड लावणी उपक्रम अंतर्गत रवींद्र साळवी यांच्या शेतामध्ये सदर उपक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी शाळेतील ७० मुलं सहभागी झाली.