‘सावंत काजू मोदकाला’ गणेशभक्तांची पसंती

- काजूच्या नावाने चिकट मोदकाद्वारे होणारी फसवणूक टाळण्यासाठी माळवाशीतील उद्योजक सौरभ सावंत कुटुंबीयांचा पुढाकार
देवरूख : गणेशोत्सवात काजू मोदकाला मोठी मागणी असते. मात्र अनेक वर्षांपासून काही व्यावसायिक चिकट व चिंगमसारखे मोदक काजू मोदकाच्या नावाने विकतात. त्यात काजूचा लवलेशही नसल्याचे दिसून येते. याद्वारे ग्राहकांची फसवणूक होते. ही फसवणूक टाळण्यासाठी माळवाशीतील तरूण व्यावसायिक सौरभ सुनील सावंत यांनी कोकणातील गावरान काजूपासून मोदक तयार केले आहेत. या काजू मोदकांना गणेशभक्तांनी पसंती दर्शवली आहे.

माळवाशीचे माजी सरपंच सुनील सावंत व सायली सावंत यांचे सुपूत्र सौरभ सावंत यांनी कृषी क्षेत्रात पदवी घेऊन नवनवीन कृषी आधारित प्रयोग करायला सुरुवात केली आहे. कोकणच्या काजू उत्पादनाचा व्यावसायिकदृष्ट्या विचार करत सावंत कुटुंबीयांनी 10 वर्षांपासून काजू उद्योग सुरू केला. कोरोनाच्या काळात या उद्योगाकडे व्यावसायिक व आर्थिकदृष्ट्या लक्ष देत काजू मोदक बनवण्यासाठी सौरभ व तिची आई सायली यांनी पुढाकार घेतला. काजूयुक्त मोदक कालांतराने बाजारपेठेत दाखल केले. मागील 5 वर्षांपासून रत्नागिरी, देवरूख, संगमेश्वर छोट्या शहरांसह मुंबई व पुणे येथील बाजारपेठेतही हे मोदक विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आले. त्याला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
यंदाच्या गणेशोत्सवापूर्वी ‘सावंत काजू मोदक’ असे ब्रँडिंग व पॅकेजिंग करून संपूर्ण महाराष्ट्रात हा कोकणचा आस्वाद पोहोचवला जात आहे. पुणे येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी मोदक अर्पण करून यंदाच्या हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई, पुण्यातील विविध कंपन्यांमध्ये हे मोदक उपलब्ध करून दिले जात असून चांगला प्रतिसाद लाभत आहे.
या उद्योगातून सौरभने अनेकांच्या हाताला काम आणि रोजगार मिळवून दिला आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती सुनील सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
याबाबत प्रतिक्रिया देताना सौरभ सावंत यांनी सांगितले की, काजूचा पदार्थ म्हटला की अनेकजण विश्वास ठेवून तो विकत घेतात. पण बाजारातील काही पदार्थांद्वारे ग्राहकांची फसवणूक होते. अनेक पदार्थांवर केवळ काजू असे लिहिलेले असते, पण प्रत्यक्षात मात्र त्यात काजूचा समावेश फार कमी असतो. त्यामुळे ग्राहकांचा भ्रमनिरास होतो. ही बाब विचारात घेऊन आम्ही पदार्थांची गुणवत्ता व दर्जा चांगला देण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही ग्राहकाची आमच्याकडून फसवणूक होणार नाही, अशी हमी देतो. कणाकणात कोकणचा स्वाद असलेले आमचे ‘सावंत काजू मोदक’ नक्कीच गणेशभक्तांना आवडतील, असे उद्योजक सौरभ सावंत म्हणाले.
चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी सावंत कुटुंबीयांच्या उद्योगातील या भरारीचे कौतुक केले. या व्यवसायातून अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निकम यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.