सून म्हणून आली आणि घर साफ करून गेली!

रत्नागिरी : तालुक्यातील पाली-मोहितवाडी येथे सुनेने ३ लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ६० हजार रुपयांची रोकड चोरुन नेली, अशी तक्रार तिच्या सासऱ्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसात दिली. दत्ताराम राजाराम मोहित (५९, रा. मोहितवाडी पाली, रत्नागिरी) असे तक्रारदाराचे नाव आहे. लग्न करून अवघे बारा दिवस होत नाही तोच नवपरिणीत सुनेने हा कारनामा केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या संदर्भात पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार ग्रामीण पोलिसांनी तक्रारदारांच्या सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला. संशयित आरोपी महिला ही तक्रारदार यांची सून आहे. तिने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. तसेच घरातील सासऱ्यांच्या बेडरुममधील लोखंडी कॉटखाली ठेवलेल्या पत्र्याच्या कुलूपबंद पेटीचे कुलूप उचकटले. त्यात ठेवलेल्या ६० हजार रोख रकमेसह ३ लाख ६२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने फिर्यादी यांच्या विश्वासघात करून त्यांच्या सुनेने चोरुन नेले, अशी तक्रार दत्ताराम मोहित यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली.