‘स्वच्छ्ता हिच सेवा’ जनजागृतीसाठी दापोलीत निघाली सायकल फेरी
दापोली : स्वच्छ भारत ही एक सामायिक जबाबदारी आहे आणि त्यासाठी केला जाणारा प्रत्येक प्रयत्न महत्त्वाचा आहे. अधिक स्वच्छ भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी स्वच्छता हीच सेवा- स्वच्छतेसाठी एक तास हा उपक्रम राबवत लोकसहभागातून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आल्या होत्या. याबद्दल जनजागृती करण्यासाठी दापोली सायकलिंग क्लब, संतोषभाई मेहता फाऊंडेशन व ज्ञानदीप दापोली तर्फे रविवारी, १ ऑक्टोबर २०२३ रोजी दिवंगत संतोषभाई फुलचंद मेहता यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्ताने सायकल फेरी काढण्यात आली.
ही सायकल फेरी आझाद मैदान दापोली, केळस्कर नाका, एसटी आगार, पोलीस स्टेशन, बाजारपेठ, फॅमिली माळ, बुरोंडी नाका, ज्ञानदीप शाळा अशा ५ किमी मार्गावर झाली. यामध्ये ज्ञानदीपच्या अध्यक्षा सरोज मेहता, नगराध्यक्षा ममता मोरे, गटशिक्षण अधिकारी आण्णासाहेब बळवंतराव, लायन्स क्लब, जेसीआय दापोली, रोटरी क्लबचे पदाधिकारी सहभागी झाले होते. या सायकल फेरीच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छतेची गरज, त्याचे फायदे आणि महत्त्व याबद्दलचे प्रबोधन करण्यात आले. स्वच्छता, साफसफाई श्रमदान मोहीम राबवण्यात आली. घर व परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेण्यात आली.
सायकल चालवण्याचे अनेक फायदे आहेत. या सायकल फेरीचे नियोजन करण्यात सुजय मेहता, सुयोग मेहता, संकेत मेहता, सुरज शेठ, विनय गोलांबडे, अंबरीश गुरव, संदीप भाटकर, ज्ञानदीप शाळेचे शिक्षकवर्ग इत्यादींचे सहकार्य लाभले. दैनंदिन जीवनात सायकलचा अधिक वापर करुया आणि आरोग्य तंदुरुस्त ठेवूया असे आवाहन आयोजकांनी केले आहे.