अवघ्या दोनच वर्षात महामार्गावरील मोरी खचली ; नव्याने काम सुरू

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या आरवली ते वाकेड या रखडलेल्या टप्प्यामधील कोरोना काळात दोन वर्षांपूर्वी केलेली आरवली येथील मोरी खचली आहे. यामुळे वाहनांना धक्के बसत असल्याने ही मोरी पुन्हा नव्याने करण्याची वेळ ठेकेदार कंपनीवर आली आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते लांजा तालुक्यातील वाकेड या टप्प्यातील काम रखडले आहे. या टप्प्यामधील आरवली येथील पेट्रोल पंपानजीकची या आधीच्या ठेकेदार कंपनीने बनवलेली ‘कमळाची मोरी’ अवघ्या दोनच वर्षात खचली आहे. या ठिकाणी दोन्ही लेनचे काम पूर्ण झाले आहे. अवघ्या दोनच वर्षात ही मोरी खचल्यामुळे महामार्गाच्या नव्या ठेकेदार कंपनीला ती नव्याने करावी लागत आहे.
अवघ्या दोनच वर्षात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील मोरी खचल्यामुळे या कामाचा दर्जा काय आहे हे त्यावरून स्पष्ट होते, अशी प्रतिक्रिया आरवली येथील ग्रामस्थ मंगेश परकर यांनी व्यक्त केली आहे.
सुस्थितीत असलेली मोरी पाडून नवीन बांधली जात असल्याने ही एक प्रकारची सार्वजनिक संपत्तीची लूटच म्हणावी लागेल. गड नदीवरील जुना ब्रिटिशकालीन पूलही जो काही वर्षांपूर्वीच मजबूत बनवण्यात आला आहे, तो देखील पाडून नवीन बांधण्याचा घाट घातला जात आहे. ही एक प्रकारे लूटच नव्हे काय?
–मंगेश परकर,
ग्रामस्थ, आरवली तालुका संगमेश्वर.
आरवली येथील गरम पाण्याच्या कुंडांनजीकची ब्रिटिशकालीन मोरी सुस्थितीत असताना देखील नुकतीच ती पाडून त्या जागी नवीन मोरी बांधली जात आहे, याबाबतही स्थानिक ग्रामस्थ असलेल्या मंगेश परकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मोरीवरून पुढे गड नदीवरील जुन्या पुलावरून गडनदी पुलावरील महामार्गाची दुसरी मार्गिका जाते. आता या जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून जाणाऱ्या मार्गीकेचे काम हाती घेण्यात आल्यामुळे मुंबईकडे जाताना वापरात असलेली मार्गीका वाहतुकीसाठी बंद ठेवून मुंबईकडून येणाऱ्या मार्गीवरून म्हणजेच गड नदीवर बांधलेल्या नव्या पुलावरून सध्या दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.