आजीची भाजी : रानभाजी

- भोकराच्या फळांची भाजी आणि लोणचे
आज पन्नासीत असणाऱ्या पिढीने बहुतेकांनी बालपणी पतंग बनविण्यासाठी, वह्या-पुस्तकांची फाटलेली पाने चिकटविण्यासाठी, बांधावर उभ्या असणाऱ्या पिकळेल्या गोडसर, चिकट भोकरांचा वापर केलेला आहे. काही ठिकाणी या भोकरांना बारगुंड, गुंदन अशी स्थानिक नावे आहेत.
आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे.
अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे भोकर..
भोकराचे फळ स्नेह नवसंग्राहक आहेत. कृमीनाशक, कफोत्सारक व खोकल्यापासून आराम देणारे आहेत. मूत्रवर्धक, कोरडा खोकला, छाती व मूत्र नलिकेचे रोग, पित्तप्रकोप, दीर्घकालीन ताप, तहान कमी करणे, जखम व व्रण भरण्यासाठी भोकरीचे फळ उपयुक्त आहे. साल, संग्राहक पौष्टिक आहे. तसेच, स्तंभक असल्याने फुफुसाच्या सर्व रोगात उपयुक्त आहे. सालाचे चूर्ण बाह्य उपाय म्हणून खाजेवर व त्वचारोगावर वापरतात.
भोकराची कोवळी पाने निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत. पानांचे देठ काढून टाकावेत. पाने बारीक चिरुन घ्यावीत. तेलात चिरलेला कांदा व मिरच्या परतून तांबूस होईपर्यंत तळून-भाजून घ्याव्यात. नंतर चिरलेली भाजी व भिजवलेली मूगडाळ घालावी. हळद, मीठ घालून सर्व भाजी चांगली परतून घेऊन थोडे पाणी घालून, ती शिजवून घ्यावी.
फळांची भाजी – भोकराची कोवळी फळे धुवून चिरावीत. बिया काढून टाकाव्यात व परत फळे चिरुन घ्यावीत. तीळ, खसखस, थोडं भाजावे. ओले खोबरे किसून घ्यावे. नंतर तीळ, खसखस, खोबरे, लसूण आले मिक्सरमध्ये बारीक करुन, ओला मसाला तयार करावा. तेलात चिरलेला कांदा भाजून घ्यावा. त्यात चिरलेली फळे घालावीत. हळद, तिखट, मीठ घालून भाजी परतून घ्यावी. ओला मसाला घालून ती परतावी. नंतर भाजी शिजवून घ्यावी.
फळांचे लोणचे – भोकराची कोवळी फळे धुवून चिरावीत. त्यातील बिया काढून टाकाव्यात. गरजेप्रमाणे फळांच्या फोडी कराव्यात. काही पध्दतीमध्ये फळे न चिरता लोणच्यासाठी अखंड वापरली जातात. फोडींना मीठ लावून चोळावे. तेल गरम करुन त्यात मोहरीडाळ, मिरची पावडर, मिरे पुड, हिंग पावडर, मेथी पावडर, हळद टाकून फोडणी करावी. फोडणी थंड झाल्यानंतर मीठ लावलेल्या फोडींवर ती ओतावी. सर्व मिश्रण चांगली मिसळून घ्यावे. आवश्यकता असल्यास लोणच्याचा मसाला घालावा. हे सर्व बरणीत भरावे. झाकण बंद करुन काही दिवस ठेवल्यानंतर लोणच्याचा वापर करावा.
काय वाचक मंडळींनो..आठवलीत का भोकरे..तांबूस, पिकलेली गोडसर, चिकट असणारी.. मग पुन्हा एखदा याचा आस्वाद घ्या आणि बालपणात रममाण व्हा.
– प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते, जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी
9403464101