आम्हाला पण तायक्वांदो शिकायचंय

- संकेता सावंत यांच्या प्रात्यक्षिकानंतर मुलांची प्रतिक्रिया
रत्नागिरी : शनिवारची सकाळ ग्रामीण भागातल्या मुलांसाठी आनंददायी ठरली कारण या मुलांनी या दिवशी गिरवले तायक्वांदो या खेळाचे प्राथमिक धडे गिरवले.
संकेता सावंत यांचे तायक्वांदो प्रशिक्षण केंद्र अभ्युदय नगर, नाचणे रोड, रत्नागिरी आणि जायंट्स ग्रुप ऑफ कुवारबाव सहेली रत्नागिरी,महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या मिरजोळे, हनुमान नगर आणि कर्ले मराठी शाळा, कर्ले, रत्नागिरी येथे तायक्वांदो प्रात्यक्षिके आयोजित करण्यात आली होती.
यावेळी दोन्ही शाळेतील मिळून एकूण ७५ मुले यात सहभागी झाली होती. या उपक्रमात सहभागी झालेल्या पहिली ते सातवीच्या वर्गातील मुलांनी अत्यंत उत्साहपूर्ण असा प्रतिसाद दिला. अचानक आलेल्या संकटावर शस्त्राचा वापर न करता मात कशी करायची? स्वतःच रक्षण कसं करायचं याची ही प्रात्यक्षिके यावेळी संकेता सावंत आणि अक्षय पाटील यांनी करून दाखवली. हा खेळ शिकायला आम्हालाही आवडेल अशी प्रतिक्रिया प्रात्याक्षिके संपल्यावर या मुलांनी संकेता सावंत यांना दिली.
यावेळी या उपक्रमामध्ये दोन्ही शाळेच्या शिक्षकवृंदाचे उत्तम सहकार्य लाभले. यावेळी जायंट्स ग्रुपच्या माजी अध्यक्ष वंदना प्रभू, प्रीती केळकर, सदस्य अनुया बाम, हेमा गांगण या उपस्थित होत्या.