आरवलीतील गरम पाण्याच्या कुंडांजवळील ब्रिटिशकालीन ओळख पुसली जाणार!

- महामार्गाच्या जुन्या मार्गिकेवरील मोरी उद्ध्वस्त
आरवली : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी येथील गरम पाण्याच्या कुंडांजवळ असलेली ब्रिटिशकालीन ओळख आता पुसली जाणार आहे. सध्या ही मोरी पाडण्याचे काम ठेकेदार कंपनीकडून हाती घेण्यात आले आहे.
ब्रिटिशांकडून जुन्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाकरिता गडनदी पुलाजवळील छायाचित्रात दिसणाऱ्या मोरीकरिता पायाचे खोदकाम सुरू असताना गरम पाण्याचे झरे आढळले होते. दूरदृष्टी असलेल्या ब्रिटिश अभियंत्यांना त्यावेळी या गरम पाण्याचे दुर्लक्ष करून मोहरीचे बांधकाम करता आले असते. मात्र तसे न करता त्यांनी तेथे गरम पाण्याची दोन कुंडे बांधली. ही कुंडे ब्रिटिश निघून गेल्यानंतर आजही सुस्थितीत आहेत. अलीकडच्या काळात या ठिकाणी अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात.
जुन्या महामार्गाच्या बांधकामावेळी लागलेल्या गरम पाण्याच्या झर्यांचे कुंडांच्या स्वरूपात जतन करून तेथील मोरी काहीशी खालील दिशेने सरकवण्यात आली आणि पूर्वीच्या मोरीच्या ठिकाणी कुंडे बांधण्यात आली. आज ही मोरी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी उदध्वस्त केली जात आहे.
मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी जी मार्गीका काढण्यात आली आहे, त्या मार्गीकेच्या कामासाठी ब्रिटिशकालीन ही जुनी मोरी पाडून नवीन बनवली जात आहे. मात्र या निमित्ताने ब्रिटिशांची कुंडा जवळील ही ओळख पुसली जात आहे.