आरवलीतील सर्व्हिस रोडच्या कामासाठीचे उद्याचे आंदोलन तहसीलदारांच्या आश्वासनानंतर स्थगित
- ठेकेदार कंपनीकडून कामही तातडीने सुरू
- मार्चअखेर काम पूर्ण करण्याचे आश्वासन
आरवली : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली येथील उड्डाणपुलाच्या बाजूने जाणाऱ्या सर्व्हिस रोडचे डांबरीकरण तसेच गटाराच्या कामासाठी ग्रामस्थांनी पुकारलेले आंदोलन तहसीलदार सौ. अमृता साबळे यांच्या सोबत शुक्रवारी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले आहे.
मुंबई गोवा महामार्गावर आरवली येथे चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी सर्व्हिस रोड तसेच तेथील गटाराचे काम पूर्ण करण्याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे. यामुळे ग्रामस्थांना होणारा त्रास लक्षात घेऊन ग्रामस्थ दिनेश परकर यांनी इतर ग्रामस्थांना सोबत घेऊन महामार्गाच्या कामासाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदार कंपनी विरोधात प्रजासत्ताक दिनी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
या पार्श्वभूमीवर संगमेश्वरच्या तहसीलदार श्रीम. साबळे यांनी आपल्या दालनात आंदोलनकर्ते ग्रामस्थ तसेच ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी, बांधकाम खात्याचे अधिकारी यांना बैठकीस बोलावले होते. या बैठकीत ठेकेदार जे.एम. म्हात्रे कंपनीने आरवलीतील हे काम पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत मागितली असून मार्चअखेर हे काम पूर्ण करून देण्यात आश्वस्थ केले आहे. आरवली येथील बाजारपेठेत यासाठीचे काम शुक्रवारपासून हाती घेण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यामुळे दिनेश परकर यांनी 26 जानेवारी रोजी या कामाच्या पूर्ततेसाठी पुकारलेले आंदोलन मागे घेत असल्याचे कळवले आहे.
या बैठकीला जे एम म्हात्रे कंपनीकडून स्वामी, बांधकाम खात्याचे कनिष्ठ अभियंता श्री. जांभळे (पाटील ), आंदोलनकर्त्या ग्रामस्थांच्या वतीने दिनेश परकर, दिनेश गुरव आदी उपस्थित होते.