आरवली बाजारपेठेतील सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरण सुरू

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे आरवली ते वाकेड दरम्यानच्या टप्प्यातील कामाने वेग घेतला असला तरी किरकोळ कामांची पूर्तता रखडली आहे. आरवली येथील उड्डाण पुलावरील दोन्ही दोन्ही मार्गिकांवरील काँक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, उड्डाण पुलाखालून जाणाऱ्या सर्विस रोडचे उर्वरित काम अजून बाकी आहे. सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरण मंद गतीने सुरू असल्याने सर्व वाहतूक उड्डाणपूलावरूनच सुरू आहे. यामुळे प्रवाशांना सर्व्हिस रोडवर येताना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
गेल्या वर्षी मे महिन्याच्या सुमारास येथील बाजारपेठेतून जाणाऱ्या उड्डाणपुलावरील काँक्रिटीकरण पूर्ण झाल्याने एका लेनवरून महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली. आता उड्डाणपुलावरील दुसऱ्या मार्गिकेचे कॉंक्रिटीकरण देखील पूर्ण झाले आहे. त्यातच उड्डाण पुलाच्या खाली दोन्ही बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडचे काम पूर्ण न झाल्याने प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागत होता.
काँक्रिटीकरण सुरू
नुकतेच मुंबई ते गोवा दिशेने सोडण्यात आलेल्या सर्व्हिस रोडचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी सर्विस रोडवरून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना सर्व्हिस रोडवरील थांबा घेणाऱ्या एसटी बसेससाठी उड्डाण पुलाच्या दोन्ही बाजूंना गाड्यांची वाट बघत बसावे लागत आहे. उड्डाण पुलावर उतरलेल्या प्रवाशांना सामान सुमानासह बाजारपेठेतील सर्विस रोड वर येताना मोठी गैरसोय सहन करावी लागते.
सर्विस रोडचे काँक्रीटीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.