महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज
उरण वाहतूक पोलिसांकडून विद्यार्थ्यांना रस्स्ता सुरक्षेचे धडे!

उरण (विठ्ठल ममताबादे ) : परंपरेने वाहणाऱ्या शिस्तीच्या धारेत नवा उजेड टाकत, उरण वाहतूक शाखेने वेशवी येथील प्राथमिक शाळेतील लहानग्यांना रस्ते सुरक्षेबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. भविष्याची पावले सुरक्षित रहावीत, यासाठी पोलीस प्रशासनाने ज्ञानाचा हा सुंदर दिवा पेटवला.
कार्यक्रमात रस्ता ओलांडताना डावीकडे–उजवीकडे पाहण्याचे महत्त्व, झेब्रा क्रॉसिंगचा योग्य वापर, शाळेच्या बसमध्ये चढताना-उतरताना काळजी घेणे, सायकल चालविताना डावीकडून चालणे, हेल्मेटचे अत्यावश्यक महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. मोबाईल किंवा हेडफोन वापरत रस्ता न ओलांडण्यासारख्या आधुनिक काळातील धोक्यांबाबतही विद्यार्थ्यांना सावध करण्यात आले.
अपघात दिसल्यास तत्काळ शिक्षकांना माहिती देणे, तसेच १०० किंवा ११२ वर कळवणे याबाबतही जागरूकता निर्माण करण्यात आली. या प्रबोधन सत्राला सुमारे ४० ते ५० विद्यार्थी व शिक्षक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
हा उपक्रम दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी पार पडला असून संपूर्ण सत्राचे मार्गदर्शन पोउनि उद्धव सोळंके यांनी उत्साहपूर्ण संयमी शैलीत केले. समाजाच्या उद्याचा पाया असलेल्या या बालकांना सुरक्षिततेचे संस्कार देत उरण वाहतूक पोलिसांनी पुन्हा एकदा संवेदनशीलतेचे उदाहरण घालून दिले.




