महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

कळंबस्ते येथील ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ चे लोकार्पण

  • पर्यावरण संवर्धनासाठी देवराईसारख्या उपक्रम प्रेरणादायी  : पालकमंत्री डाॕ उदय सामंत


रत्नागिरी  : पर्यावरण संवर्धनासाठी देवराईसारख्या उपक्रमांची मोठी गरज असून, लोकसहभागातून उभारलेली ही देवराई भविष्यात निसर्ग संवर्धनासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले.
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे उभारण्यात आलेल्या ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ या पर्यावरणपूरक प्रकल्पाचे तसेच या उपक्रमासाठी पुढाकार घेणाऱ्या प्रांताधिकारी आकाश लिगाडे व प्रशासनाचे पालकमंत्री डॉ. सामंत यांनी विशेष कौतुक केले.
प्रांताधिकारी कार्यालय व सह्याद्री निसर्ग मित्र संस्था यांच्या पुढाकारातून कळंबस्ते (रेल्वे फाटकाजवळ), ता. चिपळूण येथे उभारण्यात आलेल्या ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ या प्रकल्पाचा लोकार्पण आज पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या हस्ते कोनशिलाचे अनावरण करुन करण्यात आले.
यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ, सभापती सूर्यकांत खतले, माजी सभापती शौकत मुकादम, उपसभापती संदेश आयरे, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, उपविभागीय कृषी अधिकारी शिवाजी शिंदे, मुख्याधिकारी संजय जाधव, सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे संचालक भाऊ काटदरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डाॕ सामंत यांनी देवराई बोटॅनिकल गार्डनची पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “कोकणातील नैसर्गिक संपदा आणि जैवविविधता जपणे ही काळाची गरज आहे. कळंबस्ते येथे उभारलेली ही देवराई केवळ वृक्षसंवर्धनाचा प्रकल्प नसून, पर्यावरणाबाबत जनजागृती करणारे एक महत्त्वाचे केंद्र ठरेल. विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना निसर्गाचा अभ्यास करण्यासाठी ही देवराई उपयुक्त ठरेल. अशा प्रकारचे उपक्रम पुढील काळातही अधिक ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न केला जाईल.
एखाद्या महसूल अधिकाऱ्यांनी ठरविले तर तो काय करु शकतो, हे या विधायक कामात दिसत आहे. या परिसराला लागेल ती मदत शासन करेल. ही देवराई अशीच जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.
आमदार श्री. निकम म्हणाले, कळंबस्ते येथे उभारण्यात आलेले हे ‘देवराई – द बोटॅनिकल गार्डन’ स्थानिक जैवविविधतेचे जतन, पर्यावरण शिक्षण आणि निसर्ग पर्यटनाला चालना देणारे ठरेल.
हा प्रकल्प आरजीपीपीएल (RGPPL) आणि नेरोलॅक (NEROLAC) यांच्या प्रायोजकत्वातून साकारण्यात आला आहे.
प्रांताधिकारी श्री लिगाडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असून भविष्यात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावेल. उपविभागीय कृषी अधिकारी श्री.शिंदे यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले.
या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या संस्था, निसर्ग मित्र, नागरिक यांचा सन्मानपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, निसर्ग प्रेमी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button