कशेडी बोगद्यातील दुसऱ्या लेनवरूनही एप्रिल अखेर वाहतूक सुरु होणार!
- मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक होणारा आणखी वेगवान!
खेड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून निर्माण करण्यात आलेल्या भुयारी मार्गातील दुसऱ्या लेनवरील वाहतूक देखील या महिन्याच्या अखेरीस सुरू होईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगितले जात आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आणखी वेगवान होणार आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटातील भुयारी मार्गाचे काम बहुतांश पूर्णत्वास गेल्याने याआधी गणेशोत्सवामध्ये काही कालावधीसाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित कामासाठी ही वाहतूक बंद करून पुन्हा पूर्वीप्रमाणेच घाट मार्गे वळविण्यात आली होती. आता मुंबईतून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवरील कशेडी बोगद्याचे काम पूर्ण झाल्यामुळे २४ फेब्रुवारी २०२४ पासून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
गोवा मुंबई दिशेने मात्र वाहतूक अगजूनही सुरू झालेली नाही या मार्गीके वरील अपूर्ण कामे सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत.
कशेडी टनेलमधील दुसऱ्या लेनवरील वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने अपूर्ण असलेली कामे पूर्ण करून एप्रिल अखेरपर्यंत गोवा -मुंबई दिशेने वाहतूक सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
–पंकज गोसावी, अभियंता राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभाग.
रायगड जिल्ह्यातील भोगाव येथील पुलाचे काम पूर्ण होताच एप्रिल अखेर पर्यंत गोवा मुंबई दिशेने देखील कशेडी बोगद्यातील वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत.