कशेडी बोगद्यामुळे वाचणार ४५ मिनिटे!
डिसेंबरपर्यंत दुसरी लेन पूर्ण करण्याचा प्रयत्न : सार्व. बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण
रत्नागिरी, दि.१२ : गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांचे कशेडी बोगद्यामुळे ४५ मिनिटे वाचणार आहेत. सध्या एकेरी मार्ग सुरु करण्यात आला असून डिसेंबरपर्यंत दुसरी लेन सुरु करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली.
श्री. चव्हाण यांनी आज मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली. तसेच कशेडी बोगद्याचे फित कापून लोकार्पण केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, पनवेलपासून साडेतीन तासात आता येऊ शकतो. कशेडी बोगदा अंदाजे दोन कि.मी असून सध्या सिंगल लेन सुरु करण्यात आली आहे. वळण रस्त्यावरील प्रवासापेक्षा या बोगद्यामुळे ४५ मिनिटे प्रवास वाचणार आहे. ठिकठिकाणी महामार्गावर पोलीस मदत केंद्र, जनसुविधा केंद्र करण्याचा प्रयत्न केला आहे. वाहतुकीच्या दृष्टीकोनातून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सिंगल लेनवरुन छोट्या वाहनांना जाता येऊ शकते, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे सध्या या सिंगल लेनवर हलक्या वाहनांसाठी प्रवेश देण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या एसटी, लक्झरी यांनाही प्रवेश देता येईल का, याबाबत तपासून घ्यायला अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी कर्मचारी, तसेच कंत्राटदार या सर्वांनी अशक्य वाटणारे काम प्रचंड परिश्रम घेऊन सांगितलेल्या वेळेत पूर्ण केले आहे. वाहतुकीचे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
जनसुविधा केंद्रांचे उद्घाटन
कशेडी बोगदापासून जिल्ह्यात जागोजागी महामार्गाच्या कामकाजाची पाहणी करत येत असताना ठिकठिकाणी जनसुविधा केंद्रांचे उद्घाटनही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी केले. या वेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार, अधीक्षक अभियंता तृप्ती नाग, पेणचे कार्यकारी अभियंता निरज चवरे, कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता छाया नाईक, खेडच्या प्रांताधिकारी राजश्री मोरे, रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई, संगमेश्वरचे प्रांताधिकारी विजय सूर्यवंशी, सा.बां. कार्यकारी अभियंता अमोल ओटवणेकर उपस्थित होते.