कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा युवाब्रह्मच्या छंदवर्गाला चिमुकल्यांचा प्रतिसाद
रत्नागिरी : कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेच्या युवाब्रह्म या युवक वर्गाने पाच ते दहा वर्षे या वयोगटातील सर्व ज्ञाती बांधवातील मुलांसाठी नाचणे रोड येथील गोखले भवन या नव्या वास्तूमध्ये छंद वर्ग आयोजित केला होता. या छंद वर्गामध्ये मुलांना मराठी व संस्कृत गाणी श्लोक, स्तोत्र, नृत्य, हस्तकला, चित्रकला, चटपटीत खाऊची पाककला, विविध आणि विस्मरणात गेलेले खेळ, वृक्षवल्लीमध्ये फेरफटका, योगवर्ग, पौष्टिक खाऊची मेजवानी अशा इतर अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला होता.
लहान मुलांचा अतिशय उत्तम प्रतिसाद या शिबिराला लाभला. पालक आणि सर्व स्तरातून याचे कौतुक करण्यात आले. सुटीमध्ये मुलांसाठी उपयुक्त आणि बौद्धिक चालना देणारा असा उपक्रम या शिबिरातून राबवण्यात आला. लहान मुलांच्या विविध गुणदर्शन आणि छोटेखानी बक्षीस समारंभाने या शिबिराची सांगता झाली. समारोपावेळी कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष आणि मार्गदर्शक अनंत आगाशे, रवींद्र रानडे, सौ. आगाशे यांचे मार्गदर्शन लाभले. छंदवर्गला श्रीकांत ढालकर, सौ. माधुरी कळंबटे, गौरांग आगाशे, रवींद्र इनामदार, सिद्धी केळकर यांनी मार्गदर्शन केले.
छंद वर्गाच्या आयोजनासाठी आदिती भावे, कीर्ती मोडक, दीप्ती आगाशे, श्रद्धा जोशी, देवदत्त पेंडसे, सुषमा पटवर्धन, ओमप्रकाश गोगटे, हर्षदा मुसळे, अपूर्वा मुसळे, श्वेता केळकर, नीला केळकर, नीलम जोशी या युवाब्रह्मच्या प्रतिनिधींनी मेहनत घेतली. यापुढील छंद वर्गांची तारीख लवकरच कळविण्यात येईल असे युवाब्रह्मच्या वतीने सांगण्यात आले.