कुष्ठरोगमुक्तीसाठी प्रबोधन आवश्यक : जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह
रत्नागिरी : कुष्ठरुग्णांना उपचारासाठी जनजागृती करणे आवश्यक असून जिल्हा कुष्ठरोग मुक्तीसाठी आरोग्य
शिक्षणावर भर देण्याचे व ग्रामसभेमध्ये कुष्ठरोग विषयक संदेश देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदरसिंह यांनी
केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात कुष्ठनिवारण दिन आणि 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2023 या कालावधीत
आयोजित कुष्ठरोग पंधरवडाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
किर्तीकिरण पुजार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले,
निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड आदि संबधित अधिकारी उपस्थित होते.
कुष्ठरोग जनजागृती अभियांतर्गत कुष्ठरोग निवारण दिन व ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२३ या
पंधरवडयात आरोग्य शिक्षणाचे विविध जनजागृतीविषयक कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सहाय्यक संचालक
(कुष्ठरोग) डॉ. वसीम सय्यद यांनी सांगितले.
कुष्ठरोग विरुध्द लढा देऊन, कुष्ठरोगाला इतिहास जमा करुयात असे यावर्षीचे घोषवाक्य असून, स्पर्श कुष्ठरोग
जनजागृती अभियांतर्गत अनेक जनजागृती कार्यक्रम होणार आहेत. ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२३ या
पंधरवडयात शाळेत प्रार्थनेनंतर कुष्ठरोगाबाबतच्या प्रतिज्ञेचे वाचन करण्यात येणार आहे. शाळेमध्ये नुक्कड नाटक,
प्रश्नमंजुषा स्पर्धा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोगावरील गाणी, चित्रकला आदी जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
लवकर निदान व वेळेवर उपचाराचे महत्व तसेच कुष्ठरोगविषयीचे गैरसमज आदीबाबत जनतेमध्ये जनजागृती करण्यात
येणार आहे. स्थानिक महिला मंडळे, बचत गट स्थानिक सांस्कृतिक मंडळे यांच्या सभा घेऊन कुष्ठरोगविषयक जनजागृती
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच बाजाराच्या ठिकाणी, मजुर अड्डा येथे प्रदर्शन आयोजित करण्यात
येणार असल्याचे माहिती सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. वसीम सय्यद यांनी दिली.