कृषी पदवी प्रवेशाचे पात्रतेचे निकष झाले शिथिल!

- चिपळूण संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश
चिपळूण : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांच्या पाठपुराव्यामुळे कृषी प्रवेशासाठीचे पात्रता निकष शिथिल करण्यात यश आले आहे. यापूर्वी ५० टक्के इतकी असलेली अट शिथिल करत ती ४५ टक्क्यांपर्यंत करण्याच्या निर्णयाने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. नुकतेच बारावी उत्तीर्ण होऊन कृषी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून हा मोठा निर्माण घेण्यात आला आहे.
खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता बारावी विज्ञान शाखेत ४५ टक्के गुण असतील तर तो कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र होणार आहे. यापूर्वी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ५० टक्के गुणांची अट होती. त्यामुळे सर्वसामान्य गुणवत्ता असणारे अनेक विद्यार्थी कृषी अभ्यासक्रमाची आवड असतानाही प्रवेशापासून वंचित रहात होते. यावर आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत सतत आवाज उठवत तसेच राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडे वैयक्तिक पाठपुरावा करुन ही अट शिथिल करण्यास भाग पाडले. याचा राज्यातील अनेक विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असून कृषी अभ्यासक्रमाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा मार्ग सोपा झाला आहे..