सलग सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा ‘वीकेंड’ गणपतीपुळे किनाऱ्यावर!

- पर्यटकांच्या गर्दीने समुद्रकिनारा गजबजला
रत्नागिरी : शनिवार रविवार व सोमवार अशा सलग तीन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांनी रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे मोठ्या संख्येने हजेरी लावली. किनाऱ्यावरील श्रींच्या दर्शनासह पर्यटकांनी तेथील समुद्र सौंदर्याचा आस्वाद घेतला.
उन्हाळी पर्यटन हंगामात यावर्षी पर्यटकांनी चांगली हजेरी लावली. यामुळे गणपतीपुळे मंदिर परिसरात व्यावसायिकांमध्ये आनंदी आनंद दिसून येत होता. दिनांक 15, 16 व 17 जून अशी सलग तीन दिवस जोडून सुट्टी आल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने पर्यटक गणपतीपुळे समुद्रकिनारी दाखल झाले होते.
मोसमी पावसातील जूनचा हा दुसरा आठवडा असतानाही पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाल्याने व्यावसायिकांमध्ये आनंदी आनंद दिसून येत होता. सलग तीन दिवस जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध शहरातून शुक्रवारी रात्रीपासून पर्यटक गणपतीपुळेच्या दिशेने रवाना झाले होते. रविवारी येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची चांगलीच गर्दी दिसून आली.