ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूजसाहित्य-कला-संस्कृती

विष्णू परीट यांच्या कलाकृतीला राज्य शासनाचा पुरस्कार

  • कलाकार विभागातून निवड
  • ४ ते १० फेब्रुवारी दरम्यान प्रदर्शन

संगमेश्वर : कलासंचालनालय मुंबईच्या वतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते .या प्रदर्शनासाठी व्यावसायिक या विभागामध्ये महाराष्ट्रातील अनेक चित्रकार व शिल्पकार यांचा सहभाग असतो. यावर्षी घेण्यात येत असलेल्या ६४ व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी कोकणातील प्रथितयश निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांच्या चित्राला राज्य शासनाचे पारितोषिक जाहीर झाले आहे आहे. कला संचालनायाकडून आजच हा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील १५ कलाकारांच्या कलाकृतींना पुरस्कार जाहीर झाला असून त्यामध्ये विष्णू परीट यांचा तृतीय क्रमांक आहे.

चित्रकार विष्णू परीट

मूळ इचलकरंजी तालुक्यातील कबनूर येथील चित्रकार विष्णू परीट यांनी संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर सोनवडे येथे ३६ वर्षे कलाध्यापनाचे कार्य केले . त्याचबरोबर ते व्यावसायिक चित्रकार म्हणूनही प्रसिद्ध आहेत. चित्रकलेच्या क्षेत्रात ते सर्व माध्यमात काम करतात. असं असलं तरीही त्यांचे जल रंगावर कमालीचे प्रभुत्व आहे. टवटवीत आणि प्रवाही रंगसंगती ही त्यांच्या चित्रांची खास वैशिष्ट्य आहेत. परीट यांनी आजवर निसर्गाची शेकडो चित्रे चितारली आहेत. अनेक मान्यवरांकडे त्यांच्या चित्रांचा संग्रह आहे. कोकणचा निसर्ग त्यांनी आपल्या कुंचल्यातून सर्व दूर पोहोचवला आहे. कोकणचे ग्रामीण जीवन हा त्यांच्या चित्रांचा मुख्य विषय असतो.

यावर्षी निवड झालेल्या त्यांच्या चित्रात पहाडी जीवन हा त्यांच्या चित्राचा विषय आहे. कलाकाराच्या नजरेतून रसिकांना न्याहाळता येणारे सौंदर्य हे अंतर्मुख करायला लावणारे असते. विष्णू परीट यांच्या चित्रांचे विषय रसिकांना सहज आकलन होतील असे असतात. परीट यांच्या चित्रांची आजवर रत्नागिरी, चिपळूण , कोल्हापूर , पुणे, मुंबई आदी ठिकाणी प्रदर्शने भरली आहेत . अनेक ठिकाणी त्यांनी निसर्ग चित्रांची प्रात्यक्षिके देखील दाखवली आहेत.

या वर्षीचे ६४वे महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर कलादालनात दि.४ फेब्रुवारी २०२५ ते १० फेब्रुवारी २०२५ या दरम्यान या ठिकाणी संपन्न होणार आहे. या प्रदर्शनात विष्णू परीट यांच्या कलाकृतीला कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचा पुरस्कार झाल्याबद्दल चित्रकार विष्णू परीट यांचे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव , चित्रकार, अमित सुर्वे, रुपेश सुर्वे, मनोज सुतार, चित्रकार नाना हजारे, चित्रकार रंगा मोरे, पुणे येथील चित्रकार सोनवडेकर, प्रा. धनंजय दळवी, विक्रांत दर्डे आदींनी अभिनंदन केले आहे .

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button