कोकण रेल्वे मार्गावर धावणार दोन ‘सेम टू सेम’ जनशताब्दी एक्सप्रेस!!
काय आहे यामागील कारण?
रत्नागिरी : मडगाव ते मुंबई अशी कोकण रेल्वे मार्गे धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस सोबतीला आणखी एक आपल्यासारखीच ‘सेम टू सेम’ एक्सप्रेस घेऊन धावणार आहे. दिनांक ९ जून २०२३ रोजी तसे नियोजन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.
वनवे स्पेशल असेल सेम टू सेम जनशताब्दी एक्सप्रेस!
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्यातील मडगाव दरम्यान वनवे स्पेशल ट्रेन दिनांक 9 जून 2023 रोजी धावणार आहे.
गाडी क्रमांक ०११४९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जंक्शन वन वे स्पेशल ट्रेन या नावाने ही गाडी धावेल.
मुंबई सीएसएमटी ते मडगाव दरम्यान बिगर पावसाळी हंगामात एकाच रेकवर जनशताब्दी एक्सप्रेस चालवली जाते. म्हणजे जी गाडी सकाळी मुंबईतून गोव्यात जाते, गाडीचा तोच सेट (रेक ) परतीचा प्रवास करतो. मात्र पावसाळ्यात दरवर्षी सर्वसाधारणपणे 10 जूनपासून ऑक्टोबर अखेर पर्यंत कोकण रेल्वेकडून पावसाळी वेळापत्रकानुसार गाड्या चालवल्या जातात. कोकणात पडणारा मुसळधार पाऊस लक्षात घेऊन या कालावधीत गाड्यांचा वेग मर्यादित ठेवावा लागतो. कोकण रेल्वे मार्गावरील या बदलामुळे दरवर्षी पावसाळी वेळापत्रकात जनशताब्दी एक्सप्रेस एका रेक ऐवजी दोन रेकसह चालवली जाते. म्हणजे पहाटे मुंबईवरून निघालेली जनशताब्दी एक्सप्रेस दुपारी गोव्यात पोचल्यानंतर तीच परत न येता तशाच दुसऱ्या रेकसह चालवण्यात येते. याचसाठी रेल्वेला मुंबईतून मडगावसाठी जनशताब्दीचा दुसरा रेक पाठवणे क्रमप्राप्त ठरल्याने दिनांक 9 रोजी मुंबईतील सीएसएमटी ते मडगाव दरम्यान ०११४९ या क्रमांकाने वनवे स्पेशल गाडी चालवावी लागत आहे. या गाडीची रचना पूर्णपणे मूळ जनशताब्दी एक्सप्रेस सारखीच असणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०११४९ मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. ही एक दिशा मार्ग गाडी शुक्रवार, 09 जून 2023 रोजी मुंबई CSMT येथून 05:30 वाजता सुटेल आणि मडगाव जंक्शनला ती त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.
तर त्याआधी सी एस एम टी वरून पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी मूळ जनशताब्दी एक्सप्रेस सुटणार आहे.
वनवे स्पेशल गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमाळी स्थानकावर थांबणार आहे.
या गाडीला एकूण 16 एलएचबी कोच असतील. त्यात व्हिस्टाडोम: 01 कोच, एसी चेअर कार: 03 कोच, सेकंड सीटिंग : 10 कोच, एसएलआर – 01. जनरेटर कार: 01