कोकण रेल्वे मार्गावर धावण्यासाठी मेमू ट्रेनचे सर्व डबे कारखान्यातून रवाना!

रत्नागिरी : कोकण रेल्वेसाठी मागणी नोंदवलेले मेमू ट्रेनचे सर्वच्या सर्व म्हणजे ३२ डबे रेल्वे कारखान्यातून रवाना झाले आहेत. त्यामुळे आता लवकरच कोकण रेल्वे मार्गावर मेमू ट्रेन धावताना दिसणार आहे. ही गाडी दिवा ते रत्नागिरी मार्गावर की, प्रवासी जनतेची मागणी असलेल्या पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून कोकण रेल्वे मार्गावर धावते, याकडे लक्ष लागले आहे.
कोकण रेल्वे मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे या मार्गावरील बहुतांश गाड्या आता डिझेल इंजिन ऐवजी विजेवर धाऊ लागल्या आहेत. एकूणच देशभरातील बहुतांश रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाल्यामुळे अनारक्षित गाड्यांसाठीचे पूर्वीचे रेक बदलून त्या जागी स्वतंत्र इंजिन जोडण्याची गरज नसलेले आणि दोन्ही बाजूला रेकमध्येच इंजिन असलेले मेमू कोचसह पॅसेंजर गाड्या चालवण्याचे धोरण रेल्वेने अवलंबले आहे. त्यानुसार कोकण रेल्वेसाठी रेल्वे कारखान्याकडे मेमू ट्रेनचे कोच तयार करण्याची ऑर्डर नोंदविण्यात आली होती. मागणीनुसार कोकण रेल्वेकरिता बनवण्यात आलेले मेमू ट्रेनच्या सर्वच्या सर्व ३२ डबे कारखान्यातून रवाना झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. प्रत्येकी आठ आठ डब्यांच्या सेटमध्ये मेमूचे डबे कारखान्यातून पाठवण्यात आले आहेत. 16 डब्यांची एक गाडी याप्रमाणे कोकण रेल्वेकरिता मागणी नोंदवलेले दोन रेक (गाड्या) कारखान्यातून पाठवून झाले आहेत.
यासंदर्भात आधी प्राप्त झालेल्या माहितीनुसार सध्या दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावत असलेल्या पॅसेंजर गाडीचे दीनदयाळू श्रेणीमधील डबे बदलून त्याऐवजी दिवा-रत्नागिरी मेमू ट्रेन चालवली जाणार असल्याचे सूत्रांची माहिती होती. मात्र मुंबईतून पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून कोकण रेल्वे मार्गावर येणारी पॅसेंजर गाडी नसल्यामुळे सध्या दिवा ते रत्नागिरी मार्गावर धावत असलेली एल एच बी दीन दयाळू डब्यांची अनारक्षित गाडी आहे तशीच ठेवून नवीन डबे आलेली मेमू ट्रेन मुंबईतील वांद्रे बोरिवली किंवा वसई येथून कोकण रेल्वे मार्गावर चालवली जावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे. कोकणशी संबंधित प्रवासी संघटनांनी देखील ही मागणी उचलून धरली आहे.
मुंबईतून पश्चिम रेल्वेच्या मार्गावरून वसईमार्गे कोकण रेल्वे मार्गावर गाडी आणताना वसईला इंजिन बदलण्याचा रेल्वेला खटाटोप करावा लागत असल्यामुळे मागील अनेक वर्षापासून या गाडीची मागणी प्रलंबितच राहिली आहे. मात्र आता कोकण रेल्वेसाठी मेमूचे दोन रेक आल्यामुळे वसईला इंजिन बदलण्याची गरज नसलेलली मेमो ट्रेन कोकण मार्गावर आणणे शक्य झाले आहे.
ही स्थिती लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावर धावण्यासाठी सज्ज असलेली मेमू ट्रेन रेल्वेकडून नेमकी कोणत्या मार्गावर धावते, याकडे कोकणवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.