खादी ग्रामोद्योग राष्ट्रीय हस्तकला व प्रशिक्षण केंद्रासाठी रत्नागिरीला १३ कोटीचा निधी
एमआयडीसीकडून जागेसह निधीची तरतूद
रत्नागिरी, दि. १९ : खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे होणाऱ्या राष्ट्रीय हस्तकला व प्रशिक्षण केंद्रासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत 1200 चौ मीटर जागा उपलब्ध करुन देण्यात आली असून, 13 कोटी निधीची भरीव तरतूद केल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
पालकमंत्री श्री. सामंत यांनी पुणे येथील हस्त कागद केंद्राला भेट दिली होती. रत्नागिरीतही अशा स्वरुपाचे देशाचे नाविण्यपूर्ण राष्ट्रीय हस्तकला व प्रशिक्षण केंद्र विकसित करण्याबाबत खादी ग्रामोद्योग मंडळाला सूचना दिली होती. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची मिरजोळे एमआयडीसीमध्ये मंडळास भूखंड उपलब्ध करुन दिला आहे.
सामुहिक सुविधा केंद्रासाठी 13 कोटी निधीची भरीव तरतूदही केली आहे. लवकरच याचा भूमिपुजन समारंभ होणार आहे. या राष्ट्रीय हस्तकला केंद्र व त्यामध्ये प्रशिक्षण घेणे हे पर्यटक आणि विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.