खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा!
कशेडीचे सुपुत्र विपूल शिंदे झाले चार्टर्ड अकाउंटंट (CA)
खेड : तालुक्यातील कशेडी गावचे सुपुत्र कुमार विपूल विश्वास शिंदे यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही अत्यंत प्रतिष्ठेची व कठीण मानली जाणारी पदवी यशस्वीरीत्या प्राप्त केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कशेडी गावासह संपूर्ण खेड तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विपुल शिंदे हे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. विश्वास महाराज शिंदे यांचे सुपुत्र असून, त्यांनी सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. CA परीक्षेसारख्या कठीण परीक्षेत मिळवलेले यश हे अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
विपुल शिंदे यांच्या या यशाबद्दल गावातील ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन राष्ट्रीय पातळीवरील व्यावसायिक यश संपादन केल्याने विपुल शिंदे यांनी तरुण पिढीसमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या यशामुळे खेड तालुक्याचे नाव उज्वल झाले असून कशेडी गावाचा अभिमान वाढला आहे.





