खेड रेल्वे स्थानकावरून लवकरच कंटेनरद्वारे मालवाहतूक

- कंटेनर वाहतुकीच्या दृष्टीने सकारात्मक पाऊले
- विविध विभाग आणि उद्योजकांचा व्यापारी मेळावा संपन्न
मुंबई : कोकण रेल्वेच्या मार्गावर खेड येथून लवकरात लवकर कंटेनर वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे.याच पार्श्वभूमीवर खेड येथील उद्योजक, कोकण रेल्वे चे वरिष्ठ अधिकारी, काँनकॉर, कस्टम विभाग आणि महाप्रित यांचा एक व्यापारी मेळावा आज मुंबईत बीकेसी येथे पार पडला. खेडमधून होऊ घातलेल्या कंटेनर वाहतुकी बाबत येथे सकारात्मक चर्चा करण्यात आली आहे.
खेड रेल्वे स्थानकातून सुरू होणाऱ्या कंटेनर वाहतुकीसाठी वेगाने पाऊले उचलली जात आहेत.

या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागांना या निमित्ताने एकच छत्राखाली आणण्याचा आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरे मिळवण्याचा प्रयत्न या व्यापारी मेळाव्याच्या निमित्ताने करण्यात आला.काँनकॉर चे चेअरमन संजय स्वरूप यांनी काँनकॉर ने रत्नागिरी आणि खेडमध्ये व्यापार वृद्धी साठी केलेले प्रयत्न आणि खेडमधून होऊ घातलेल्या कंटेनर वाहतुकीचे फायदे सांगितले. कोकण रेल्वे चे संचालक संतोष कुमार झा यांनी व्यापार वृद्धीसाठी खेड आणि रत्नागिरी येथे उभारल्या जात असलेल्या गोदाम,शीतगृह अशा विविध सुविधांची माहिती दिली.संतोष कुमार झा यांनी कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध ठिकाणी विविध योजनांतर्गत उभारल्या जात असलेल्या पायाभूत सुविधा बाबत माहिती दिली.
काँनकॉर च्या कमल जैन यांनी खेड मध्ये उद्योजकांना काँनकॉर कडून दिल्या जाणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली.जेएनपीटी सीमाशुल्क उपायुक्त रामदास काळे यांनी व्यापाराशी संबंधित सीमाशुल्क विभागाचे नियम आणि बदलत्या काळातील व्यापार यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.या व्यापारी मेळाव्यात खेड चिपळूण येथून आलेल्या उद्योजकांनी अनेक शंका – प्रश्न उपस्थित करण्यात आले आणि त्यांचे शंका निरसन कोकण रेल्वे,काँनकॉर आणि सीमाशुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

मुंबईत आज संपन्न झालेल्या व्यापारी मेळाव्यात विविध विभाग आणि उद्योजक एकत्र आल्याने त कोकण रेल्वे च्या मार्गावर व्यापार वृद्धीच्या दिशेने सुरू असलेल्या प्रयत्नात महत्त्वाचे पाऊल पडले आहे.खेड मधून फेब्रुवारी च्या मध्यापासून कंटेनर वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने या मेळाव्यात सकारात्मक चर्चा करण्यात आली.