गणपतीपुळे मंदिरानजीक किनाऱ्याला लाटांचा तडाखा ; प्रेक्षागॅलरी -पायऱ्यांची पडझड
रत्नागिरी : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे समुद्री लाटांचे स्वरूपही आक्रमक पाहायला मिळत आहे. मोठ्या लाटांच्या तडाख्यामुळे गणपतीपुळे येथील मंदिरा नजीकच्या संरक्षक भिंतीची पडझड झाली आहे. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास समुद्री लाटा मंदिराच्या दिशेने आणखी आत मध्ये धडकण्याची भीती निर्माण झाली आहे.
मागील काही दिवसांपासून समुद्रात जोरदार लाटा उसळताना पाहायला मिळत आहत. मोठ्या लाटा किनाऱ्यावर धडकत असल्यामुळे रत्नागिरी शहरानजीकच्या मिऱ्या किनाऱ्यावर तसेच गणपतीपुळे येथील स्वयंभू श्रींच्या मंदिर आवारातही लाटांचा तडाखा बसू लागला आहे.
मोठ्या लाटांमुळे मंदिरानजीक पर्यटकांसाठी उभारलेली संरक्षण भिंत वजा प्रेक्षा गॅलरीची लाटांमुळे पडझड झालेली पाहायला मिळत आहे. पडझड झालेल्या याच पायऱ्या वजा पेक्षा गॅलरीवर बसून मंदिरात आलेले पर्यटक गणपतीपुळे येथील समुद्राच्या सौंदर्याचा आस्वाद घेत असतात. मंदिराजवळ संरक्षक भिंतीची नासधूस झाल्यामुळे तातडीने उपाययोजना हाती घ्यावी लागणार आहे. अन्यथा लाटांचा तडाखा आणखी आतापर्यंत बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.