महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सलोकल न्यूज

गणेशोत्सवात चिपळूण, खेडसाठी मेमू ट्रेन ऐवजी पारंपरिक गाड्या चालवाव्यात

  • कोकण विकास समितीचे रेल्वेला पत्र

मुंबई: मध्य रेल्वेने गणेशोत्सवासाठी जाहीर केलेल्या दिवा ↔ चिपळूण (०११५५/०११५६) आणि दिवा ↔ खेड (०११३३/०११३४) या दोन ८ डब्यांच्या अनारक्षित मेमू (MEMU) गाड्यांवरून कोकणातील प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. कोकण विकास समितीने या गाड्यांचा लाभ मर्यादित प्रवाशांनाच होणार असल्याचे सांगत, मध्य रेल्वेला २४ डब्यांच्या पारंपरिक लोको-हॉल्ड रेकसह ह्या गाड्या दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस किंवा बोरिवली येथून चालवण्याची मागणी केली आहे.

मेमू ट्रेन मधील असं रचना

प्रवाशांना दिवा/पनवेलला जाणे गैरसोयीचे
समितीच्या म्हणण्यानुसार, गिरगाव, लालबाग, परळ, दादर, माहिम, अंधेरी, सांताक्रुज, बोरिवली, भाईंदर, वसई, ठाणे आणि घाटकोपर परिसरातील लाखो चाकरमानी प्रवाशांना दिवा किंवा पनवेल येथे पोहोचणे गैरसोयीचे ठरते. त्यामुळे घोषित केलेल्या मेमू गाड्यांचा प्रत्यक्ष लाभ फार कमी प्रवाशांना मिळेल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

८ डब्यांच्या मेमू गाड्यांवर आक्षेप
गणेशोत्सवातील प्रचंड गर्दी पाहता, केवळ ८ डब्यांच्या मेमू गाड्या देणे हा “अप्रस्तुत आणि असमर्थनीय” निर्णय असल्याचे कोकण विकास समितीने म्हटले आहे. मेमू ट्रेनच्या प्रवासी वहन क्षमतेवर ४ डब्यांमध्ये एका मोटर कोचचे निर्बंध आणि सीटच्या वरच्या भागात बसण्याची सुविधा यामुळे प्रतिकूल परिणाम होतो. समितीच्या मते, मेमूची क्षमता नियमित डब्यांच्या गाडीपेक्षा किमान ४० टक्क्यांनी कमी असते. “खेळण्यातील गाडीप्रमाणे” दिलेल्या या गाड्या गर्दीवर किती नियंत्रण मिळवणार, हा संशोधनाचा विषय असल्याचेही पत्रात नमूद केले आहे.
अनारक्षित डब्यांची समस्या
संपूर्ण अनारक्षित गाड्यांमध्ये आरक्षणाची कोणतीही हमी नसल्यामुळे पुढील स्थानकांवरील प्रवाशांना जागा मिळत नाही. यामुळे गाड्यांची संख्या वाढलेली दिसत असली तरी, त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळत नाही, असे समितीने निदर्शनास आणले आहे.
कोकण विकास समितीच्या प्रमुख मागण्या:

पारंपरिक रेकमधील आसनरचना
  • प्रस्थान स्थान बदलणे: ०११५५/०११५६ आणि ०११३३/०११३४ या दोन्ही गाड्यांचे प्रस्थान स्थान दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, वांद्रे टर्मिनस किंवा बोरिवली येथे करावे. यामुळे पश्चिम आणि मध्य मुंबईतील जास्तीत जास्त प्रवाशांना थेट लाभ मिळेल.
  • रेकचा प्रकार बदलणे: मेमूऐवजी २४ डब्यांच्या पारंपरिक लोको-हॉल्ड रेक वापरून या गाड्या चालवाव्यात. यामध्ये सामान्य द्वितीय श्रेणी आरक्षित डबे, एसी चेअर कार डबे आणि सामान्य अनारक्षित डबे असावेत.
    या उपाययोजनांमुळे कोकणातील प्रवाशांना योग्य सेवा उपलब्ध होईल, तसेच रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ होईल, अशी अपेक्षा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे. मध्य रेल्वे या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे कोकणातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button