गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी शहरातील रस्त्यांची दुरुस्ती : मुख्याधिकारी तुषार बाबर
रत्नागिरी दि.०३ : येणाऱ्या गणेशोत्सव सणापूर्वी रत्नागिरी नगर परिषदेकडून शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण् करण्यात येत आहे. पावसाचे प्रमाण जसे कमी होईल त्याप्रमाणे शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे पावसाळी डांबर, खडी वगैरे साहित्य आदींचा वापर करुन गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करण्याची कार्यवाही सुरु आहे, अशी माहिती मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी दिली.
रत्नागिरी शहरामध्ये अतिवृष्टीमुळे विविध भागातील रस्त्यांना फार मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. सद्यस्थितीत अद्यापपर्यंत दररोज नगर परिषदच्या बांधकाम विभागाकडून डबर कच, पावसाळी डांबर, खडी वापरुन खड्डे बुजविणेचे काम सातत्याने सुरु आहे. पावसाचा जोर कायम असल्याने सदरचे खड्डे हे वारंवार निर्माण होत आहेत.
गणेशोत्सव व इतर सणांचा विचार करता निघणा-या मिरवणुकांच्या मार्गावरील उघडी गटारे बंदिस्त करण्यासाठी आवश्यकतेनुसार पाहणी करण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे गणेश मूर्तीचे विसर्जनाच्या ठिकाणच्या रस्त्याची धूप झाल्याने याठिकाणी भराव करणे व इतर आवश्यक ती कामे करण्याची कार्यवाही सुरु आहे. मांडवी येथे गणपती विसर्जनासाठी आवश्यक असणारा रॅम्प दुरुस्ती व मांडवी ते नाईक फॅक्टरी दरम्यान समुद्र किनारपट्टीच्या रस्ताच्या एकदिशा वाहतूकीच्या दृष्टीने खडीकरणाचे काम ही गणेशोत्सव सणापूर्वी पूर्ण करण्याची कार्यवाही सुरु आहे.