महाराष्ट्ररत्नागिरी अपडेट्सराष्ट्रीयलोकल न्यूजशिक्षण

गरीब विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक जमा करणाऱ्या अवलियाची राष्ट्रीय पातळीवर दखल

  • ‘कोकण भूषण’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

रत्नागिरी : समाजातील मूठभर लोकांच्या चांगुलपणावर समाजाचा रहाटगाडा ओढला जातो, या मुठभर लोकांच्या चांगुलपणाला काहीजण समाजकार्य म्हणतील तर काहीजण रिकामटेकडेपणा!…. मात्र रत्नागिरीचे सुपुत्र आणि पेशाने ड्रायव्हर असणारे विकास साखळकर यांच्याकडे पाहिल्यानंतर दातृत्व म्हणजे काय हा प्रश्न सहज सुटतो. सर्वसामान्य चालक म्हणून काम करणारे विकास साखळकर यांच्या कामाची दखल कोणी घेतली नाही तरच नवल!
गेल्या अठरा वर्षात 49 वेळा केलेलं रक्तदान असो, माणुसकीची भिंत या छत्राखाली गोरगरीब लोकांसाठी कपडे वाटप असो, किंवा यावर्षी चालू केलेला जुनी पाठ्यपुस्तके हा उपक्रम असो, प्रत्येक कामात त्यांनी आपला विशेष ठसा उमटवला.
परीक्षा झाल्यानंतर “जुनी पाठयपुस्तके रद्दीत कवडीमोलाच्या भावाने विकू नका ती माझ्याकडे द्या,” ती मी गरीब गरजू मुलांपर्यंत पोहोचवून त्यांना शिक्षणाचा मार्ग मोकळा करून देईन, या मथळ्याखाली सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हाट्सअप ग्रुपवरती त्यांनी मेसेज पाठवला होता.या मेसेजला भरभरून असा प्रतिसाद मिळाला. एकूण 36 विद्यार्थ्यांची जुनी पाठ्यपुस्तके त्यांनी जमा केली त्यापैकी यापूर्वीचं त्यांच्याकडे मागणी केलेल्या 28 विद्यार्थी विद्यार्थिनींची पाठ्यपुस्तकाची गरज त्यांनी पूर्ण केली. काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्याकडची जुनी पुस्तके साखळकर यांच्याकडे देऊन आपल्या पाल्यासाठी पुढील इयत्तेची पुस्तके मागून घेतली.
मागील 17/18 वर्ष गोरगरिबांसाठी अहोरात्र झोकून देऊन काम करणाऱ्या विकास साखळकर यांची महाराष्ट्र दिन तसेच संस्थेच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्वराज्य ग्राहक न्यायनिवाडा वेल्फेअर समिती (दिल्ली) या संस्थेने दखल घेऊन “कोकणभूषण” हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान केला. शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ,सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. तातडीची आवश्यकता असताना आजपर्यंत 38 वेळा रक्तदान करणाऱ्या विकास साखळकर यांचा या कार्यक्रमात श्री सद्गुरु आदिनाथ महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इचलकरंजी येथे पार पडलेल्या या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर श्री सद्गुरु आदिनाथ महाराज, श्री सद्गुरू किशोरनंद महाराज, श्री. ह. भ. प. तात्या महाराज तसेच दत्तात्रय मांजरे हेमंत जावीर दयानंद जावीर मारुतीराव सावंत उमेश चावरे असे अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.
साखळकर यांचा हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे

यापूर्वी मिळालेले पुरस्कार

  • आदर्श रक्तदाता – रक्तदान क्षेत्रात काम करणारी रत्नागिरी मधील सर्वात मोठी अग्रगण्य संस्था जीवनदान गृप रत्नागिरी
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर *समाजभूषण पुरस्कार, क्रांतीसुर्य सामाजिक संघटना वालचंदनगर, बारामती
  • महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर *समाजभूषण पुरस्कार* ( तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटना, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा यांच्या सौजन्याने)
  • विक्रमी रक्तदाता
  • ( जिल्हा शासकीय रक्तपेढी आणि जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांच्या सौजन्याने)
  • समाजरत्न पुरस्कार (CBS मराठी न्यूज, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर यांच्या सौजन्याने )
  • महाराष्ट्र जीवनगौरव पुरस्कार
  • हिरकणी महिला विकास संस्था पुणे आणि विसावा सोशल फाउंडेशन पुणे यांच्या सौजन्याने
  • जीवन भूषण पुरस्कार
  • ( नवक्रांती सेवाभावी संस्था बारामती आणि मानव सुरक्षा सेवा ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्याने असे विविध राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.

स्वतःची आर्थिक झोळी फाटकी असताना सुद्धा ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाचेच आपण काहीतरी देणे लागतो याच उद्देशाने काम करणाऱ्या विकास साखळकर यांना मिळालेल्या कोकणभूषण या राष्ट्रीय पुरस्कारामुळे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Team RatnagiriLive

कोकणातील महत्वाच्या घडामोडी, रेल्वे, पर्यटन विषयक अपडेट्स तसेच इतरही अनेक ताज्या घडामोडींची वेगवान माहिती क्षणार्धात वाचकांपर्यत पोहचवीणारा डिजिटल प्लॅटफॉर्म

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button